रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही, नीलेश राणेंनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:50 PM2022-05-30T18:50:09+5:302022-05-30T18:54:00+5:30

राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता

Refinery project will not be allowed to run says Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही, नीलेश राणेंनी दिला शब्द

रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही, नीलेश राणेंनी दिला शब्द

googlenewsNext

राजापूर : तालुक्यात आलेला करोडोंची उलाढाल असणारा रिफायनरी प्रकल्प काेणत्याही परिस्थितीत घालवू देणार नाही. त्यासाठी सज्ज व्हा, कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लागेल, अशा शब्दात भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी सांगितले.

राजापूर शहरातील श्रीमंगल कार्यालयात भाजपतर्फे रविवारी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बाेलत हाेते. या मेळाव्याला माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, ॲड. विलास पाटणे, संतोष गांगण, उल्का विश्वासराव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता. मात्र आता परिस्थिती खूप बदलली आहे. प्रकल्पाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भविष्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील प्रत्येक गावातील बेरोजगारांना या प्रकल्पातून रोजगार मिळतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या बाजूने कोकणी माणसाने राहिले पाहिजे, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

पूर्वी राजापूर हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राजापूर तालुका रिफायनरी प्रकल्पामुळे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बनणार आहे. कोकणचे भवितव्य उज्ज्वल असताना दुसरीकडे काही नतद्रष्ट मंडळी कोकणी जनतेला चुकीचे मार्गदर्शन करताना त्यांची माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. अशा मंडळींना त्यांची जागा दाखविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन नीलेश राणे यांनी केले.

राजापूर तालुक्यातच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणार हे निश्चित असून त्यासाठी सज्ज व्हा, आपल्यासमवेत या, कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, ॲड. विलास पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. रिफायनरी प्रकल्प कसा उपयुक्त ठरेल ते सर्वांनी स्पष्ट केले.

Web Title: Refinery project will not be allowed to run says Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.