रिफायनरी हटाव... कोकण बचाव, रत्नागिरीत शिवसेनेचा लाँगमार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 02:17 PM2018-09-01T14:17:47+5:302018-09-01T14:20:06+5:30
राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने रत्नागिरीतील साळवीस्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यं लाँगमार्च काढण्यात आला.
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने रत्नागिरीतील साळवीस्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यं लाँगमार्च काढण्यात आला. या लाँगमार्चमध्ये हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त व शिवसैनिक सहभागी झाले होते.
लाँगमार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त केला. रिफायनरी हटाव...कोकण बचाव, रिफायनरी हद्दपार झालीच पाहिजे अशा आशयाचे बॅनर सहभागी प्रकल्पग्रस्तांच्या हातात होते. साळवीस्टॉपपासून निघालेल्या या लाँगमार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्तदेखील ठेवला होता.
या लाँगमार्चमध्ये शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, संजय साळवी, जगदीश राजापकर, नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरीचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, तालुका संघटक कांचन नागवेकर, तसेच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक व प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.