राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीचे स्वागत करायला हवे : प्रभाकर शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:54+5:302021-07-08T04:21:54+5:30

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला ...

Refinery should be welcomed for overall development of Rajapur: Prabhakar Shirke | राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीचे स्वागत करायला हवे : प्रभाकर शिर्के

राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीचे स्वागत करायला हवे : प्रभाकर शिर्के

Next

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. राजापूर शहर आणि तालुक्याला आलेली अवकळा दूर करायची असेल तर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत बारसू येथील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर शिर्के यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी बाेलताना ते म्हणाले की, सागरी महामार्ग झाल्यापासून राजापुरातील नाटे, जैतापूर पंचक्रोशीतील सर्व रहिवासी आपल्या गरजा भागविण्यासाठी रत्नागिरी शहरात जात आवश्यक सामान खरेदी करीत आहेत. राजापुरात फक्त शासकीय कामासाठीच त्यांचे येणे-जाणे सुरू आहे. हेच पूर्वी राजापूरच्या बाजारपेठेत यायचे आज येत नसल्याने याचा राजापूर बाजारपेठेला आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे शहरातून जाण्याऐवजी १६ किलाेमीटर दूरवरून जात आहे. सध्या असलेले रेल्वे स्टेशन शहरात किंवा जवळ नसल्यामुळे प्रवासीच नव्हे तर मालवाहतुकीसाठी गैरसोयीचे झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग जो शहराच्या वेशीवरून जातो. त्याचा बाजारपेठेला फायदा होत नाही. पूर्वी जैतापूरचे मुसाकाझी ते राजापूर बाजारपेठ असा जलमार्ग होता. प्रवासी व मालवाहतूक या मार्गे होत असे ती बंद झाल्यामुळे व्यापार उदिमास उतरती कळा आली.

अलीकडच्या काळात राजापुरात एकही नवा प्रकल्प झालेला नाही. त्यामुळे वस्ती तर वाढली नाहीच; पण येथील तरुण रोजगारासाठी मुंबईला व अन्य शहरांत धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत राजापूर शहराचा विकास होणे शक्यच नाही. मनापासून राजापूरचा विकास व्हावा, असे वाटत असल्यास या सर्व बाबींवर मात करण्यासाठी एकच पर्याय आहे. तो म्हणजे बारसू, सोलगाव भागातील प्रकल्प मार्गी लावणे. हा प्रकल्प झाल्यास राजापूर शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा विकास होणे शक्य होईल व राजापूरचा स्मार्ट सिटीच्या कक्षेत समावेश होईल. प्रकल्पामुळे रस्ते, आरोग्यसेवा, विद्यालये, अखंड वीजपुरवठा, रोजगार, ग्रीन बेल्टसाठी होणारी अतिरिक्त लागवड अशा अनेक सुविधा उपलब्ध होतील, असे शिर्के यांनी म्हटले आहे.

Web Title: Refinery should be welcomed for overall development of Rajapur: Prabhakar Shirke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.