रिफायनरी राजापूरवासीयांच्या मदतीलाही धावेल : पंढरीनाथ आंबेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:07+5:302021-05-09T04:33:07+5:30

राजापूर : खोट्या पर्यावरणवाद्यांच्या जहरी प्रचाराला भुलून आपण औद्योगिक प्रकल्पांना कायम विरोध करत राहिलो आणि त्यामुळेच आज आपला तालुका ...

Refinery will also come to the aid of Rajapur residents: Pandharinath Amberkar | रिफायनरी राजापूरवासीयांच्या मदतीलाही धावेल : पंढरीनाथ आंबेरकर

रिफायनरी राजापूरवासीयांच्या मदतीलाही धावेल : पंढरीनाथ आंबेरकर

Next

राजापूर

: खोट्या पर्यावरणवाद्यांच्या जहरी प्रचाराला भुलून आपण औद्योगिक प्रकल्पांना कायम विरोध करत राहिलो आणि त्यामुळेच आज आपला तालुका अद्ययावत आरोग्य सेवेपासून वंचित राहिला आहे. कोरोना महामारीत वेळेत ऑक्सिजन बेड, आयसीयू सुविधा न मिळाल्याने राजापुरातील अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील जनतेने मागणी केल्यास, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास रिफायनरी प्रकल्प कंपन्या आजही तालुक्यात ऑक्सिजन प्लांट, आयसीयू सुविधा पुरवतील, असे आवाहन पंढरीनाथ आंबेरकर यांनी केले आहे.

राजापूर तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४२ उपकेंद्रे व २ ग्रामीण रुग्णालये आहेत. मात्र, अनेक ठिकाणी तज्ज्ञ डाॅक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील केंद्रे बंद अथवा अत्यंत अल्प काळाकरता चालू अवस्थेत आहेत. साधी रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी यासाठी आपल्याला तालुका मुख्यालय गाठावे लागते. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तींना सुद्धा वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. गंभीर रुग्ण तर जिल्हा रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपले प्राण गमावतात. आज कोरोना महामारीच्या काळात तर तालुक्याची अवस्था फार बिकट झाली आहे. ऑक्सिजन बेड, आयसीयू नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना महामारीत रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा आज भारतातील मोठमोठे उद्योग करत आहेत. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा, रिलायन्स व मुख्यत्वे रिफायनरीकडून हा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना होत आहे. केरळ, गुजरातमधील रिफायनरी तेथील स्थानिक सरकारी इस्पितळांना हा पुरवठा प्राधान्याने करत आहेत.

खोट्या पर्यावरणवाद्यांच्या जहरी प्रचाराला भुलून आपण मात्र अशा औद्योगिक प्रकल्पांना कायम विरोध करत राहिलो. हे पर्यावरणवादी आज या कठीणप्रसंगी लपून बसले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे़

राजापूर तालुक्यात रत्नागिरी रिफायनरीची घोषणा झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सन २०१८च्या अखेरीस झालेल्या एका बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे संपूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे रिफायनरीतर्फे मान्य करण्यात आले होते. लगेचच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊन त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली. मात्र, आपल्या दुर्दैवाने लगेचच त्याच्या पुढील महिन्यात रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली व संबंधित सर्व प्रस्ताव बारगळला.

रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला नसता तर आज ज्या सुविधा आपण रायपाटण कोविड सेंटरकरिता जमवाजमव करीत आहोत, त्या सर्व राजापूर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असत्या, असे पंढरीनाथ आंबेरकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Refinery will also come to the aid of Rajapur residents: Pandharinath Amberkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.