रिफायनरी आंदोलकांचे नेते वालम यांच्यासह दोघांना अटक मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:20 PM2018-01-15T23:20:40+5:302018-01-15T23:20:46+5:30
राजापूर : रिफायनरी प्रकल्पावरून रविवारी कुंभवडे येथे झालेली हाणामारी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन यावरून तीन प्रकारच्या गुन्ह्यात दोन्ही बाजूच्या २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
राजापूर : रिफायनरी प्रकल्पावरून रविवारी कुंभवडे येथे झालेली हाणामारी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन यावरून तीन प्रकारच्या गुन्ह्यात दोन्ही बाजूच्या २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १० जणांना अटक करून त्यांना सोमवारी राजापूर न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, या मारहाणप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांचे नेते अशोक वालम व मंगेश चव्हाण यांना अन्य गुन्ह्यात पुन्हा अटक करण्यात आली आहे.
रविवारी एकूण तीन गुन्हे दाखल झाले. हाणामारीबाबत परस्परविरोधी तक्रारी आहेत. या हाणामारीवरून असंख्य लोक नाटे पोलीस स्थानकात जमले.त्यामुळे जमावबंदी आदेश मोडल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. कुंभवडे येथे रविवारी रिफायनरी प्रकल्पावरून समर्थक विरुद्ध विरोधक अशी हाणामारी झाली होती. त्यामध्ये प्रकल्प समर्थक कुंभवडेचे पंढरीनाथ आंबेरकर यांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पंढरीनाथ आंबेरकर यांनी राजापूर स्थानकात अशोक वालम, त्यांची पत्नी आणि मंगेश चव्हाण अशा तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
रिफायनरी परिसरात मनाई आदेश असतानाही या हाणामारीनंतर सुमारे आठशे ग्रामस्थांचा जमाव नाटे पोलीस स्थानकात गेला होता. त्यामुळे नाटे पोलिसांनी अशोक वालम यांच्यासह २३ जणांविरुद्ध जमावबंदी आदेश मोडल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यातील अशोक वालम, विलास नार्वेकर, सचिन कोरगावकर, मंगेश चव्हाण व नितीन जठार यांना अटक करण्यात आली होती. त्या सर्वांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता प्रत्येकी पंधरा हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. त्याचवेळी दर रविवारी नाटे पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
कुंभवडे येथे बैठकीत झालेल्या हाणामारीबाबत परस्पर विरोधी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशोक वालम यांची पत्नी अश्विनी वालम यांनी बैठकीत आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर, मेघनाथ विश्वनाथ आंबेरकर, ज्ञानदीप आंबेरकर, अरुण बापू आंबेरकर व संदीप नारायण पांचाळ यांच्याविरुध्द तक्रार नोंदविली होती. त्यापैकी पंढरीनाथ आंबेरकर हे जखमी असून ते रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना अटक झालेली नाही. उर्वरीत चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रत्येकी साडेसात हजाराच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली, तर दिनांक १५ मार्चपर्यंत दर गुरुवारी राजापूर पोलीस स्थानकात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या हाणामारीत पंढरीनाथ आंबेरकर हे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अश्विनी वालम यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यात त्यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली व दर शनिवारी राजापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले.
जमावबंदी आदेश मोडल्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झालेल्या अशोक वालम व मंगेश चव्हाण यांना नाटे पोलिसांनी न्यायालयाच्या बाहेर पुन्हा अटक केली. याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर व त्यांचे सहकारी यांच्या बाजूने अॅड. शशिकांत सुतार, अॅड. सुनील मेस्त्री व अॅड. समीर कुंटे यांनी तर अशोक वालम व अन्य पाच यांच्यावतीने अॅड. चंद्रशेखर अभ्यंकर यांनी काम पाहिले. बेकायदा जमावबंदी करणाºया आणखी अठराजणांची ओळख पटली असून, त्यांना अटक झालेली नाही.