वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 03:25 PM2023-07-10T15:25:23+5:302023-07-10T15:25:44+5:30

अत्याधुनिक पद्धतीने पाण्याची खोली आणि प्रवाह मोजला जात आहे

Regular survey started in Vashishthi river, water depth measurement work after flood situation in Chiplun | वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम

वाशिष्ठी नदीत नियमित सर्वेक्षण सुरु, चिपळुणातील पूरपरिस्थितीनंतर पाण्याची खोली मोजण्याचे काम

googlenewsNext

चिपळूण : महापुरामुळे चिपळूणच्या झालेल्या हानीनंतर पावसाळ्यात वाशिष्ठी नदीमध्ये वाढणारे पाणी आणि त्या पाण्याचा प्रवाह याची मोजणी केंद्रीय जल आयोगाकडून नियमितपणे केली जात आहे. वाशिष्ठी नदीच्या गांधारेश्वर पुलावरून दरराेज सकाळी सर्वेक्षण केले जात आहे.

चिपळुणात २२ जुलै २०२१ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाशिष्ठी व शिव नदीला आलेल्या महापुरात चिपळूणचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याशिवाय मनुष्यहानीही झाली. कोयना धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने महापुराचा वेढा चिपळूण शहरासह आजूबाजूच्या गावांना बसला, असा आरोप त्यानंतर सातत्याने होऊ लागला. चिपळूण बचाव समिती आणि नागरिकांनी याविरोधात लढा उभारत तब्बल महिनाभर साखळी उपोषणातून केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.

यानंतर वाशिष्ठी नदीतील पूर आणि पुराची कारणे शोधण्यासाठी मोडक समितीची स्थापना करण्यात आली. या मोडक समितीने वर्षभर अभ्यास करून तयार केलेला आपला अहवाल शासनाला दिला. यादरम्यान, पावसाळ्यात दोन वेळा वाशिष्ठी नदीत पाणी सोडून व पाणी न सोडता पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करण्यात आले होते.

या वर्षी लांबलेल्या पावसाने जून महिन्याच्या अखेरीपासून चांगलाच जोर धरला आहे. नियमित पावसाळा सुरू झाल्यामुळे केंद्रीय जल आयोग विभागाच्या चिपळूण कार्यालयातर्फे नियमितपणे वाशिष्ठी नदीतील पाणी पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. वाशिष्ठी नदीच्या गांधारेश्वर पुलावरून सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने पाण्याची खोली आणि प्रवाह मोजला जात आहे. चिपळुणात पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे येणारा महापूर यावर निरीक्षण करण्यासाठी हे सर्वेक्षण केंद्रीय जल आयोगातर्फे केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Regular survey started in Vashishthi river, water depth measurement work after flood situation in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.