रत्नागिरीत रविवारपासून शहरवासियांना नियमित पाणीपुरवठा
By मेहरून नाकाडे | Published: June 15, 2024 05:43 PM2024-06-15T17:43:57+5:302024-06-15T17:44:31+5:30
पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक ‘पाणी कपात’ बंद करण्याची मागणी करत होते. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शीळ धरणातील पाण्याची पातळी पाहून पाणी कपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी - मान्सून जिल्ह्यात चांगला बरसत असून आतापर्यंत सरासरी २६०. ४६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. त्यामुळे नद्या, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ‘शीळ’ धरणातील पाण्याची पातळी उंचावल्याने शहरवासियांना रविवार (दि.१६) पासून नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
रत्नागिरी शहराला ‘शीळ’ धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणातील पाणीसाठा खालावला होता. मान्सून पर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा पुरेसा करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सोमवार १३ मे पासून ‘एक दिवसा आड पाणी पुरवठा’ सुरू होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.
पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक ‘पाणी कपात’ बंद करण्याची मागणी करत होते. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शीळ धरणातील पाण्याची पातळी पाहून पाणी कपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारपासून नागरिकांना दररोज पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
रत्नागिरी शहरात ११ हजार २८८ नळजोडण्या असून दिवसाला २० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. रविवारपासून योग्य दाबाने नागरिकांना पाणीपुरवठा होणार असल्याचे रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.