लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी संबंध, तिघांना अटक; रत्नागिरी धक्कादायक प्रकार
By अरुण आडिवरेकर | Published: June 22, 2023 06:57 PM2023-06-22T18:57:52+5:302023-06-22T18:58:14+5:30
अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रत्नागिरी : तालुक्यातील अल्पवयीन मुलीला तीन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा व दिवा मुंबई, साठरेबांबर येथे घडली आहे. याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.
यज्ञेश अनंत धनावडे, प्रतीक संतोष ताम्हणकर, रुतिकेश रवींद्र शिंदे अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी जयगड पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (जे) ३७६ (२) (एन) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ९ (एल) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.
तीन संशयितांनी मुलीला घरी सोडण्याचा बहाणा करून शारीरिक संबंध ठेवल्याचे गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. तसेच, २०१८ ला त्याच्या घराच्या मागे व पीडिता अंघोळ करत असताना तिचा मोबाइलवर व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचे समाेर आले आहे. अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.