कामथे कोविड सेंटरमध्ये रूग्णाच्या नातेवाइकांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:43+5:302021-05-29T04:24:43+5:30
चिपळूण : उत्तर रत्नागिरीतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी आधार ठरलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारपासून ...
चिपळूण : उत्तर रत्नागिरीतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी आधार ठरलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी रुग्णालय आवारात पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. पर्यायी व्यवस्था करण्यापूर्वीच हा निर्णय घेतल्याने नातेवाईकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या तालुक्यातील १७ गावे कोरोनाचे हॉटस्पॉट असून, या गावांमध्ये तब्बल १०७ वाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणेसोबत आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. त्यातच गृह अलगीकरण न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने शासकीय कोविड सेंटरमध्ये पुन्हा रूग्णांची वाढ होऊ लागली आहे. अशातच कामथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
मुळात या रुग्णालयात आरोग्य यंत्रणा अपुरी आहे. त्यातच एखाद्या रुग्णाला औषध किंवा इंजेक्शन लागल्यास रुग्णाच्या नातेवाइकालाच बाजारपेठेतून आणावे लागते. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णाच्या मदतीसाठी नातेवाइकांना थांबावे लागते. मात्र, आता प्रशासनाने बंदी घातल्याने नातेवाइकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.