गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 06:32 PM2024-09-06T18:32:37+5:302024-09-06T18:33:16+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर गती

Relief for Mumbaikars coming to Konkan during Ganeshotsav The second tunnel in Kashedi is also open for Mumbaikars | गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला 

गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला 

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा वाहतुकीस गुरुवारी (५ सप्टेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वाढलेल्या वाहतुकीला थोडा दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत एका बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते. शिमगोत्सवादरम्यान २५ फेब्रुवारीपासून कशेडी बोगद्यातून कोकणात येणाऱ्या लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. तब्बल एका वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदा यावर्षी गणेशोत्सव कालावधीसाठी वाहनांसाठी सुरू करण्यात आला असल्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवात महामार्गावर सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यात कशेडी घाटात अधिक समस्या येतात. मात्र, आता प्रवाशांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. ४० मिनिटांचे अंतर फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे. सद्य:स्थितीत कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या दोन स्वतंत्र बोगद्यांपैकी मुंबईकडे जाणारा बोगदा येणाऱ्या व जाणाऱ्या अशा दोन्ही वाहनांसाठी वापरण्यात येत आहे. मात्र, नव्याने सुरू झालेल्या या बोगद्यात केवळ एकाच मार्गिकेचे काम पूर्ण झाले असल्यामुळे या बोगद्यातून आता कोकणात येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर गती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाच्या पाहणीनंतर दोन्ही बोगद्यांतून वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले हाेते. महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीने कामाला वेग देऊन दुसऱ्या बोगद्यातील तीनपैकी एक मार्गिका सुरू केली आहे. यामुळे अवघड व धोकेदायक कशेडी घाटातील प्रवासातून चाकरमान्यांची सुटका झाली आहे.

Web Title: Relief for Mumbaikars coming to Konkan during Ganeshotsav The second tunnel in Kashedi is also open for Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.