कोरोना रुग्णसंख्या घटल्याने राजापूरला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:21+5:302021-05-20T04:34:21+5:30
राजापूर : गेल्या दोन दिवसांत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा घटल्याने राजापूर तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. ...
राजापूर : गेल्या दोन दिवसांत राजापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा घटल्याने राजापूर तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
मंगळवारी, १८ मे रोजी ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ९०२ इतका झाला आहे. राजापूर तालुक्यात मृतांचा आकडा वाढला असून, आजपर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राजापूर तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल परांजपे यांनी दिली आहे.
गत सप्ताहात राजापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र, हा आठवडा काहीसा दिलासादायक ठरत आहे. सोमवारी १६, तर मंगळवारी १६, असे ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवार अखेर तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,७५८ इतका झाला आहे. यापैकी ९०२ रुग्ण अॅक्टिव्ह असून, ७८७ जण उपचाराअंती बरे झाले आहेत, तर ६९ जण मृत्युमुखी पडले आहेत. अॅक्टिव्ह ९०२ रुग्णांमध्ये ७५४ जण होम आयसोलेशनमध्ये, रायपाटण कोविड केअर सेंंटरमध्ये ६३ जण, जिल्हा शासकीय रुग्णालयात ५३ जण, खासगी रुग्णालयामध्ये १४ जण, तर तालुक्याबाहेर १८ जण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ग्रामीण भागात प्रिंदावणमध्ये २२ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आले होते. या ठिकाणी आरोग्य विभागाचे एक विशेष पथक काम करीत असल्याचे डॉ. परांजपे यांनी सांगितले.