आपत्ती काळातील राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान उल्लेखनीय -उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:37 AM2021-09-10T04:37:48+5:302021-09-10T04:37:48+5:30
रत्नागिरी : आरोग्य, महसूल यासारख्या विभागातील व्यक्तीबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी आपत्ती काळात केलेले योगदान उल्लेखनीय आहे, त्यांच्या सेवा ...
रत्नागिरी : आरोग्य, महसूल यासारख्या विभागातील व्यक्तीबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी आपत्ती काळात केलेले योगदान उल्लेखनीय आहे, त्यांच्या सेवा कार्याची दाखल घेणे, गौरव करणे हे मी कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘कोविड योद्धा’ सत्कार समारंभ आणि ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन उपस्थित होत्या. मंत्री सामंत यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उदय सामंत म्हणाले की, सेवाभावी वृत्ती आपल्या कृतीतून दाखविणाऱ्या युवा स्वयंसेवकांच्या बळावर आपण आपत्तींना सामोरे जाऊ शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गुहागरच्या खरे-ढेरे महाविद्यालयातील प्रथमेश परांजपे,
कुडाळ येथील बॅ. नाथ पै कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती नाईक यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी कोविड संक्रमण काळात घ्यावयाच्या दक्षतेविषयी विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून जागृती केल्याबद्दल स्वयंसेवकांना सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महापुरात सेवा कार्य केलेल्या खरे-ढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. युवराज पाटील यांनाही गौरविण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या रसायनशास्त्रातील दोन संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी स्वागत केले, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी आभार मानले, तर प्रा. शिवाजी उकरंडे यांनी सूत्रसंचालन केले.