‘शालान्त प्रमाणपत्र पास’चा शेरा विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:35+5:302021-07-27T04:33:35+5:30
मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे दहावीची प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य झाले नसल्याने अंतर्गत मूल्यमापनानुसार सरसकट सर्व ...
मेहरुन नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे दहावीची प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य झाले नसल्याने अंतर्गत मूल्यमापनानुसार सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. ऑनलाइन निकाल जाहीर झाला असला तरी अद्याप प्रत्यक्ष गुणपत्रके प्राप्त झालेली नाहीत. शाळांकडे विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र त्यावर दरवर्षीप्रमाणे ‘माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र’ परीक्षा पासचा उल्लेख असणार आहे. मात्र परीक्षा न झाल्याने महिन्याचा उल्लेख न करता शेरा मारला जाणार आहे.
दरवर्षी मार्चमध्ये शालान्त प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येत असते. त्यामुळे दाखल्यावर महिन्याचा व वर्षाचा उल्लेख करून शालान्त प्रमाणपत्र पासचा शेरा शाळेकडून मारला जातो. मात्र या वर्षी परीक्षा न झाल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. गुणपत्रकांसह दाखले दिले जात असल्याने शेरा काय मारावा याबाबत मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला. चर्चेअंती घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पासचा शेरा मारताना महिन्याचा उल्लेख मात्र वगळण्यात आला आहे.
गुणपत्रकासह दाखला देण्यात येतो. मात्र या वर्षी परीक्षा घेण्यात आली नसल्याने शेरा काय मारावा, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून सूचना प्राप्त झाल्यानंतर महिन्याचा उल्लेख वगळता, शालान्त प्रमाणपत्र पासचा शेरा मारण्यात आला आहे.
- गायत्री गुळवणी, मुख्याध्यापक, रा.भा. शिर्के प्रशाला
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर दाखले तयार करण्यास प्रारंभ केला होता. मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून शेरा मारण्याबाबतचा प्रश्न वेळेवर मार्गी लावण्यात आला. त्यामुळे दाखले तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. गुणपत्रकाबरोबर दाखले देणे त्यामुळे सोपे होणार आहे.
- एस.व्ही. पाटील, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, नेवरे
ज्या महिन्यात परीक्षा घेण्यात येतात, त्याचा उल्लेख करून शालान्त प्रमाणपत्र पास असा शेरा मारला जातो. मात्र या वर्षी परीक्षाच मार्चमध्ये झाल्या नसल्याने शेरा मारण्याबाबत संभ्रम होता. वरिष्ठ स्तरावरून परीक्षा न झाल्याने महिन्याचा उल्लेख न करता, शालान्त प्रमाणपत्र पासचा उल्लेख करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी
कोरोनामुळे दहावीची परीक्षा प्रत्यक्ष झाली नाही. परंतु शैक्षणिक वर्षात मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे महिन्याचा उल्लेख करणे गरजेचे होते. परीक्षा न झाल्यामुळे फक्त शालान्त प्रमाणपत्र पासचा उल्लेख केला आहे. वर्षाचा उल्लेख असल्याने तेवढी समाधानाची बाब आहे.
- पी.एस. पाटील, पालक
शालान्त प्रमाणपत्र पासचा शेरा दाखल्यावर मारण्यात आला आहे. त्यामुळे मुलांवर अन्याय झाला नाही. परीक्षाच घेण्यात आलेली नसल्याने महिन्याचा उल्लेख करणे शक्यच नाही. शासनाचा निर्णय योग्य आहे. मुलांच्या सुरक्षेमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती.
- साक्षी खेडेकर, पालक