‘बांधकाम’चा खोडा जिल्हाधिकाऱ्यांकडून दूर

By admin | Published: November 19, 2014 09:20 PM2014-11-19T21:20:31+5:302014-11-19T23:14:31+5:30

नवीन इमारत : जिल्हा शासकीय कार्यालये २६ जानेवारीपासून नव्या जागेत?

Removal of 'Construction' from the District Collector | ‘बांधकाम’चा खोडा जिल्हाधिकाऱ्यांकडून दूर

‘बांधकाम’चा खोडा जिल्हाधिकाऱ्यांकडून दूर

Next

रत्नागिरी : बांधकाम विभागाने अंदाजपत्रकात पाणी आणि वीज यांचा समावेश केला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्षापूर्वीच सुसज्ज झालेल्या इमारती वापराविना पडून होत्या. मात्र, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी हा खोडा दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने आता या दोन्ही इमारतींच्या उद्घाटनाचा मुहूर्त येत्या २६ जानेवारी रोजी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १५ आॅगस्ट २०१३ रोजी या इमारतींचे उद्घाटन होणार असे म्हटले जात होते. या नव्या दोन इमारतीत कोणकोणती कार्यालये ठेवावी, यांचे वाटपही झाले आहे. या दोन्ही बिल्डिंगपैकी प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत. ‘ए’ बिल्डिंगमध्ये एकूण १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये ठेवण्यात येणार आहेत. ‘बी’ इमारतीत १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांचा कारभार एकछत्री झाला, तर विविध कार्यालयांची कामे एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे जनतेचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग अंदाजपत्रक तयार करताना वीज आणि पाणीपुरवठा या दोन मुख्य गोष्टीच नमूद करायला विसरला. त्यामुळे या दोन्ही इमारती तयार होऊनही त्यात कार्यालये स्थलांतर करता येत नाहीत. गेल्या वर्षीपासून या नव्या इमारतीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, या दोन्ही इमारतीत विद्युत पुरवठा आणि पाण्याची काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने या कार्यालयाला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अखेर याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नेहमीप्रमाणे सकारात्मक भूमिका घेत बांधकाम विभागाच्या चुका दुरूस्त करून इमारतीच्या उद्घाटनाचा खोडा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
गेले वर्षभर या दोन्ही इमारती ओस पडलेल्या असल्याने आता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपल्या स्तरावर प्रयत्न केले. ते यशस्वीही झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही इमारतींमध्ये विजेचा पुरवठा मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचीही सोय होणार आहे. ही कामे आता अंतिम टप्प्यात आल्याने या दोन्ही इमारतींच्या उद्घाटनातील अडसर दूर झाला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी ही सर्व कायालये या नव्या वास्तूत जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

बिल्डिंग - बी १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये
तळमजला : नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि संजय गांधी निराधार योजना विभाग एकाच ब्लॉकमध्ये, तसेच लेखा शाखा आणि भूसंपादन विभाग एकाच ब्लॉकमध्ये.
पहिला मजला : रोजगार हमी योजना, नगररचनाकार, भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन आणि नियंत्रण कक्ष (वातानुकुलीत).
दुसरा मजला : पुरवठा शाखेसाठी दोन ब्लॉक, तर उर्वरित दोन ब्लॉकमध्ये जिल्हाधिकारी यांची केबिन तसेच
सभागृह.


अशी राहणार कार्यालयांची रचना...


बिल्डिंग ए - १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये
तळमजला : जिल्हा माहिती कार्यालय, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सहजिल्हा उपनिबंधक वर्ग-१ मुद्रांक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र.
पहिला मजला : महाराष्ट्र विकास महामंडळ आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय एकाच ब्लॉकमध्ये राहणार आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था (पदूम) आणि (पणन) एकाच भागात राहतील.
दुसरा मजला : जिल्हा सांख्यिकी अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय एकाच भागात आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दुसऱ्या भागात, तर उर्वरित भागात सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र हेही एकाच भागात राहणार आहेत. शेवटच्या भागात सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालय आहे.

Web Title: Removal of 'Construction' from the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.