निर्यातीवरील निर्बंध हटविल्याने आंबा पाठविणे झाले सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:33 AM2021-03-27T04:33:06+5:302021-03-27T04:33:06+5:30
फोटो २६ नाकाडे फोल्डरला सेव्ह आहेत. - ७९२ डझन आंब्याची रत्नागिरीतून निर्यात - येत्या चार दिवसांत ४०८ डझन आंबा ...
फोटो २६ नाकाडे फोल्डरला सेव्ह आहेत.
- ७९२ डझन आंब्याची रत्नागिरीतून निर्यात
- येत्या चार दिवसांत ४०८ डझन आंबा होणार निर्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : हापूस आंब्याचा मधुर स्वाद व अवीट गोडीने परदेशी नागरिकांनाही भुरळ घातली आहे. हापूस आंब्याची साल पातळ असल्याने, उष्णजल प्रक्रियेमुळे आंबा खराब होतो, त्यामुळे निर्यातीवरील निर्बंध हटविण्यात आले असल्याने, परदेशी आंबा निर्यातीचा मार्ग सोपा झाला आहे. रत्नागिरीतून ७९२ डझनाची पहिली कन्साइन्मेंट कतार व लंडनसाठी रवाना झाली आहे. येत्या चार दिवसांत ४०८ डझन आंबा लंडनसाठी रवाना होणार आहे.
निसर्गाच्या दृष्टचक्रातून वाचलेला आंबा बाजारात आला असून, वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविल्या जाणाऱ्या आंब्यापैकी ४० टक्के आंब्याची निर्यात आखाती व युरोपीय देशात सुरू होती. मात्र, कत्तार व लंडन या देशातून आंब्याला मागणी होत असून, रत्नागिरीतून पहिली कन्साइन्मेंट २६ मार्च रोजी रवाना झाली आहे. कतारसाठी ४२६ डझन तर लंडनसाठी ३६६ डझन आंबा निर्यात करण्यात आला आहे. ८०० रुपये डझन दराने आंब्याला दर प्राप्त झाला आहे.
कत्तार व लंडन या देशात आंबा निर्यात करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील प्रसन्न पेठे, आनंद मराठे, दत्तात्रय तांबे या तीन बागायतदारांकडील ७९२ डझन हापूस पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रात दाखल झाला होता. पणन विभागातर्फे आंब्यावरील प्रक्रिया केंद्रांची जबाबदारी सद्गुरू एंटरप्रायझेसकडे तीन वर्षांपूर्वी सुपुर्द करण्यात आली आहे. बागायतदारांशी संपर्क साधून निवडक दर्जेदार आंबा पाठविण्यात येत आहे. तत्पूर्वी आंब्याचे ग्रेडिंग, वॉशिंग, ब्रशिंग, ड्रॉइंग करून तो योग्य पद्धतीने पॅकिंग करून वातानुकूलित व्हॅनने मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात आला. मुंबईतून हवाई सेवेद्वारे लंडन, कत्तारकडे रवाना झाला आहे.
उत्पादन कमी असल्याने निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध होत नाही. मात्र, वाशी, तसेच स्थानिक बाजारपेठेतील दरही गडगडले असल्याने बागायतदार आंबा निर्यातीसाठी तयार झाले आहेत. लंडनसाठी ४०८ डझन आंब्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संपर्क साधून येत्या तीन-चार दिवसांत आंबा लंडनसाठी निर्यात केला जाणार आहे. लंडनसाठी २०० ते २२० ग्रॅमच्या वजनाचा तर कतारसाठी २३० ते २७० ग्रॅम वजनाच्या आंब्याची निवड करण्यात आली आहे.
कोट
तीन वर्षे सद्गुरू एंटरप्रायझेस निर्यातीसाठी जिल्ह्यात सक्रिय आहे. अपेडा मान्यता प्रमाणपत्र एंटरप्रायझेसने घेतले आहे. पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रामध्ये आंब्यावर प्रक्रिया करून आंब्याचे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविण्यात येतो. कोकणचा आंबा परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचविताना, शेतकऱ्यांना जागेवरच चांगला भाव तर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद्गुरू एंटरप्रायझेस.