महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत : रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना
By मनोज मुळ्ये | Published: May 23, 2024 05:15 PM2024-05-23T17:15:28+5:302024-05-23T17:15:48+5:30
रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे तात्काळ हटवावेत, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संबंधित ...
रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे तात्काळ हटवावेत, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संबंधित ठेकेदार कंपनींना दिल्या आहेत. त्याचबराेबर नगर परिषदेने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, साईडपट्टींचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती, साईडपट्टी, कचरा, रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा, वाहतुकीला होणाऱ्या अडचणीबाबत गुरुवारी पाहणी केली. त्यावेळी संबंधित यंत्रणांना त्यांनी सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी सिंह यांनी मारुती मंदिर येथील चौकात वाहतूक सुरळीत होण्यासाठी पार्कींग, स्टॉपिंग पट्टी करण्याबरोबरच या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला डांबरीकरणाचा थर करण्याची सूचना दिली. साळवी स्टॉप येथे चौपदरीकरणाची पाहणी करुन हे काम गतीने करावे तसेच पाऊस पडल्यानंतर बाजूला असणारे मातीचे ढिगारे वाहून चिखल होणार नाही, याची दक्षता घेऊन ते बाजूला करावेत. कुवारबाव आणि हातखंबा येथेही रस्त्याच्या कामाची पाहणी करुन दिशादर्शक फलक, रम्बलर लावण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.
हातखंबा-पाली रस्त्यावरील कामाची पाहणी करुन जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले की, रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घ्यावेत. रस्त्याची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी १ जूनपूर्वी पूर्ण करावीत. ख्वाजा जमेरीनगर भागातील रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्याचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्मुलन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, पोलिस यंत्रणांच्या माध्यमातून रबर बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्व सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाचे अथवा भरतीचे अलर्ट असताना नागरिकांनी सतर्क राहून आपली आणि इतरांची काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी सांगितले की, मान्सूनच्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, लहान मुलांची काळजी म्हणून धोकादायक साकव बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. आरोग्य विभागालाही सतर्कच्या सूचना देण्यात आल्या आहे. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहुल देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.