सेवानिवृत्तांची काळजी दूर
By admin | Published: July 14, 2014 12:07 AM2014-07-14T00:07:25+5:302014-07-14T00:11:24+5:30
वार्धक्याचे देणे.. : निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्यांचे संरक्षण
आनंद त्रिपाठी : वाटुळ , शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची रक्कम परत मिळते. मात्र सेवानिवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने आजारांनी ग्रासलेले असताना त्यांना ही सुविधा मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आजारपणातल्या खर्चाची काळजी दूर केली आहे. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्याचे संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून या प्रस्तावावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वाक्षरी केली आहे. ही योजना न्यू इंडिया इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स या कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
या विमा संरक्षणाची महत्वपूर्ण बाब म्हणजे यासाठी कोणत्याही वैद्यकीय यंत्रणांची गरज नसून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठीदेखील विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या विम्याचा वार्षिक हप्ताही नेहमीच्या वैयक्तिक वैद्यकिय विमा पॉलिसीच्या तुलनेने कमी आहे. सध्या कार्यरत असलेल्या तसेच नजीकच्या काळात निवृत्त होणाऱ्या कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्यासाठी ही वैद्यकीय गटविमा योजना लागू करण्यात आली आहे. प्रारंभी १ जुलै २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत निवृत्त होणाऱ्या सर्व अ, ब आणि क गटातील सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना राहिल. यामध्ये कर्मचारी व त्याची पत्नी वा पती यांना विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी एक वर्षासाठी म्हणजे ३० जूनपर्यंत असेल, त्यानंतर तिचे आपोआप ३० जूनपर्यंत नूतनीकरण होईल. प्रत्येक वर्षी सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यामध्ये सामावून घेतले जातील. यामध्ये आंतररुग्ण म्हणून झालेला रुग्णालयातील खर्च कर्मचाऱ्याला मिळू शकेल. तसेच ठराविक बाह्यरुग्ण उपचाराचे पैसेदेखील मिळतील. ही योजना थर्ड पार्टी अॅडमिनीस्ट्रेटरमार्फ त राबविण्यात येणार असून राज्यातील बाराशेहून अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस पद्धतीने उपचार घेता येतील. अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य शासकीय गट ‘अ’ संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी पाच लाख रुपये विमा संरक्षण असून त्यासाठी ९ हजार ४०० वार्षिक हप्ता असेल. ब गटातील कर्मचारी ३ ते ५ लाख विमा संरक्षण व ७,८०० ते ९,५०० वार्षिक हप्ता तर क गटातील कर्मचाऱ्यांसाठी १ ते ३ लाख विमा संरक्षण व ६००० ते ७,८०० वार्षिक हप्ता असेल.
हा वार्षिक हप्ता आगावून भरण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यास अग्रीत देण्याची सोय आहे. या विमा पॉलीसी संदर्भात कोणतीही शंका आल्यास १८००२३३११६६ या हेल्पलाईनशी संपर्क साधावा. जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांची यासंदर्भात जबाबदारी असेलअसे यामसुद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.