महासैन्यभरतीपासून रत्नागिरीकर दूर

By admin | Published: February 10, 2015 10:56 PM2015-02-10T22:56:12+5:302015-02-10T23:50:44+5:30

मेळाव्याकडे पाठ : परजिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्गचा प्रतिसाद ठंडा ठंडा..

Removing Ratnagiri from MahaSaayanayya | महासैन्यभरतीपासून रत्नागिरीकर दूर

महासैन्यभरतीपासून रत्नागिरीकर दूर

Next

रत्नागिरी : रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू असलेल्या महासैन्यभरती मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यासाठी झालेल्या मेळाव्याला एकदम थंडा प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीतील अनेक होतकरू तरूणांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली.तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यासाठी सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री २.३० वाजल्यापासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. मात्र, त्यावेळीही तरूणांमध्ये भरतीबाबत जोश नसल्याचे दिसून आले. याउलट पहिले दोन दिवस झालेल्या भरतीला त्या-त्या जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तरूण मिळेल त्या जागी आपले बस्तान मांडून, मिळेल त्या जागेत झोपून या भरती प्रक्रियेत सामील झाले होते.रत्नागिरीतील काही तरूणांना निकष माहित नसल्याने महामेळाव्याच्याठिकाणी आल्यावर माघारी परतावे लागले. उर्वरित जिल्ह्यांमधून या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. समस्या येऊ नये, यासाठी काही तरूण दोन दिवस अगोदरच रत्नागिरीत येऊन राहिले आहेत.
रत्नागिरीसारख्या ठिकाणी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती होत आहे. तब्बल आठ दिवस होणाऱ्या या सैन्यभरतीकडे रत्नागिरीकरांनीच पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सैन्यदलातील नोकरीबाबत जिल्ह्यात जागृतीच नसल्याचे यामुळे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)

अटींनी संधी हुकवली
रत्नागिरीतील रोहित कारकर (२५) हा रेल्वे स्थानकानजीक राहणारा एक तरूण. घरची गरिबी. वडील सुरक्षारक्षक. खासगी नोकरी करणारा हा तरूण केवळ अटीत न बसल्याने आवड असतानाही सैन्यभरतीपासून लांब राहिला. दिवसभर रेंगाळत राहत त्याने या भरतीतून अखेर काढता पाय घेतला. वय, उंची दोहोंमध्येही तो बसत नसल्याने त्याने केलेली मेहनत वाया गेली. मनापासून सैन्यात जायचं होतं, अटींनी संधी हुकवल्याची खंत ‘लोकमत’शी बोलताना त्याने व्यक्त केली.

सिंधुदुर्गचाही अल्प प्रतिसाद
रत्नागिरीबरोबरच सिंधुदूर्ग जिल्ह्याचाही या सैन्यभरतीसाठी अल्प प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरातून तब्बल ६ हजारच्या आसपास उमेदवार आले असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केवळ १३०० उमेदवारच या सैन्यभरती मेळाव्याला उपस्थित होते. कोकणातून सैन्यभरतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
लोंढे वाढले
रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांनी या भरतीकडे पाठ फिरवली असली, तरी अन्य जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी सैन्यात भरती होण्यासाठी जागृती करण्याची वेळ येत होती. मात्र, आता सैन्यभरतीमध्ये स्वत:हून तरूण सामील होत असल्याचे या भरती मेळाव्यामुळे दिसून येत आहे.
जागा मिळेल तेथे विश्रांती
सैन्यभरती मेळाव्यासाठी आलेले तरूण जागा मिळेल तेथे विश्रांती घेताना आणि जेवण करताना दिसून येत होते. काहींनी पडक्या इमारती तसेच रिकाम्या गाळ्यांचाही आश्रय घेतला होता.


मध्यरात्रीही नगरसेवक हजर...!
रत्नागिरी : सैनिक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सत्यप्रतींच्या सहीशिक्क्यांसाठी वणवण करावी लागू नये, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष राहुल पंडित रात्री १०.३० वाजल्यापासून पहाटे ३.३० पर्यंत शिवाजी स्टेडियमजवळ ठाण मांडून बसले
होते.
नगरसेवक सलील डाफळे आणि उपनगराध्यक्ष संजय साळवी यांनीही त्यांना साथ देत असंख्य मुलांची वणवण संपवली. रात्री १0 वाजण्याच्या सुमारास काही मुले आपल्या दाखल्यांच्या सत्यप्रतींसाठी राहुल पंडित यांच्या घरी गेली. सैनिक भरतीसाठी येत असलेल्या मुलांना सह्यांची गरज लागेल आणि रात्रीच्यावेळी त्याच्यावर वणवण फिरण्याची वेळ येईल, हे लक्षात घेऊन पंडित यांनी लगेचच स्टेडियमजवळ जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते रात्री १०.३० वाजता स्टेडियमजवळ जाऊन टेबल टाकून बसले.
थोड्याचवेळात नगरसेवक डाफळेही सह्या करण्यासाठी तेथे आले. रात्री १ वाजण्याच्या सुमारास उपनगराध्यक्ष संजय साळवी हेही तेथे आले. तिघेही साडेतीन वाजेपर्यंत उमेदवारांना सह्या करून देत होते. कोठीही वणवण न करता सह्या मिळाल्याबद्दल उमेदवारांनी त्यांचे आभार मानले. नगरसेवकांनी स्वत:हून केलेल्या या कामामुळे उमेदवारांची सोय झाली. याचपध्दतीने मंगळवारी रात्री कोल्हापूरमधून येणाऱ्या उमेदवारांच्या सोईसाठी हे नगरसेवक तेथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


नोकरीसाठी आलेल्या मुलांना कागदपत्रे ‘सत्यप्रत’ करण्यासाठी रात्रीच्यावेळी भटकत राहवे लागू नये किंवा तेवढ्या कारणासाठी त्यांचा अर्ज बाद होऊ नये, यासाठीच आपण सह्या करण्यासाठी तेथे टेबल टाकले होते. कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही, तर देशसेवा करू इच्छिणाऱ्या मुलांच्या सेवेसाठी आम्ही तेथे थांबलो होतो.
- राहुल पंडित,
नगरसेवक, रत्नागिरी

Web Title: Removing Ratnagiri from MahaSaayanayya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.