पाचल-कोंडवाडी रस्त्यावरील मोरीची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:21 AM2021-07-19T04:21:05+5:302021-07-19T04:21:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाचल : गेले आठ दिवस पाचल आणि पाचल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पाचल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचल : गेले आठ दिवस पाचल आणि पाचल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पाचल बाजारपेठेतून कोंडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिवाळवाडी स्मशानाजवळची मोरी वाहून गेल्याने येथील वाहतूक व रहदारी ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. बांधकाम विभागाने या मोरीची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी तेजस गोरुले यांनी केली आहे.
पावसाचे पाणी आणि अर्जुना धरणाचा कालवा फुटून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे मोरी वाहून गेली आहे. रस्त्याचे परस्पर दोन भाग पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. पाचल कोंडवाडीची सुमारे ५०० लोकवस्ती आहे. पाचल बाजारपेठेत जाणारा हा एकमेव रस्ता आहे. बावकरवाडी, गोरुलेवाडी, धनगरवाडी येथील नागरिक याच रस्त्याने पाचल बाजारपेठेत येत असतात. माेरी वाहून गेल्याने लोकांची फार मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे या माेरीची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.