माेडकळीस आलेल्या विद्युत खांबाची ग्रामस्थांकडून डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:43+5:302021-06-18T04:22:43+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा - मोरेवाडीतील मोडकळीस आलेला विद्युत खांब धाेकादायक बनला हाेता. ग्रामस्थांनी धाेका ओळखून या ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा - मोरेवाडीतील मोडकळीस आलेला विद्युत खांब धाेकादायक बनला हाेता. ग्रामस्थांनी धाेका ओळखून या खांबाची डागडुजी करून जीर्ण झालेल्या या वीजखांबाला तात्पुरता आधार दिला आहे.
तालुक्यात झालेल्या वादळामुळे पाकतेकरवाडीतील विद्युत खांब मोडून पडला होता. त्यावेळी जीवितहानी होता होता टळली होती. त्यानंतर मोरेवाडी व पाकतेकरवाडीमधील गंजून जीर्ण झालेले वीजखांब बदलण्याची विनंती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतीची कामे सुरू आहेत. बहुतांशी जीर्ण झालेले विद्युत खांब भातशेतीमध्ये आहेत. मुसळधार पावसात वाऱ्याचा जाेर वाढल्यास हे धाेकादायक वीजखांब काेसळण्याची भीती आहे. यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या भरवशावर न राहता, मोरेवाडीतील ग्रामस्थांनी जाड लोखंडी सळ्या, खडी, सिमेंट व वाळू इत्यादीचा वापर करून मोडकळीस आलेल्या मोरेवाडीकडे येणाऱ्या विद्युत खांबाला महेंद्र मोरे, संजय मोरे, तुकाराम मोरे व अजय मोरे यांनी काॅंक्रिट करून तात्पुरती डागडुजी केली. त्यामुळे खांब पडण्याची शक्यता कमी झाली आहे.