काैंढर काळसूर पुलाची दुरुस्ती तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:15+5:302021-06-23T04:21:15+5:30
असगोली : तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी पुलावरून वाहत असते. तरी या पुलाची दुरुस्ती तातडीने करावी तसेच पुलाखालील ...
असगोली : तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी पुलावरून वाहत असते. तरी या पुलाची दुरुस्ती तातडीने करावी तसेच पुलाखालील कचरा व गटारे साफ करावा, अशी मागणी गुहागरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागरचे उपअभियंता सलोनी निकम यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, झोंबडी गुरववाडीच्या मार्गावरील कौंढर काळसूर येथील पुलावरून नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. याच पाण्यातून नागरिक व वाहनचालक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने अतिशय जीवघेणा प्रवास या ठिकाणाहून होत असतो. याठिकाणी मोठा जीवघेणा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाखालील कचरा तसेच गटारे साफ करावी तसेच या फुलाचे दुरुस्तीचे काम वेळीच करावे, जेणेकरून या पुलावरून पाणी जाणार नाही, यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी, असे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.
यावेळी उपअभियंता सलोनी निकम यांनी सांगितले की, हा पूल विशेष दुरुस्ती क गटमधून मंजूर असून, सध्या पुलाखालील कचरा तसेच गटारे साफ करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करणार आहोत. ते काम काही दिवसांत पूर्ण होईल. यावेळी मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, तेजस पोकळे, दिनेश निवाते, वैभवी जानवळकर, कौस्तुभ कोपरकर, वनिता निवाते, ऋतिक गावणकर, रुपेश घवाळे, रोहित खांबे, शैलेश खांबे, विलास खांबे, सानिका मेटकर, नितीन खांबे व अजित पोकळे उपस्थित होते.
------------------------
गुहागर तालुका मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता सलोनी निकम यांना कौंढर - काळसूर पूल दुरुस्तीसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.