आंबा घाटातील ‘त्या’ खड्डयाची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:38+5:302021-07-14T04:36:38+5:30
टेंभे : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या आंबा घाटामध्ये रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्डय़ाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
टेंभे : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या आंबा घाटामध्ये रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्डय़ाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत बांधकाम खात्याने या खड्ड्याची दुरुस्ती केली असून, या ठिकाणी डेली नेटर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, या खड्डय़ाच्या आजूबाजूचा रस्ता काही प्रमाणात खचलेला असल्याने धाेका टळलेला नाही.
कोकण व पश्चिम महाराष्ट्र विशेषत: रत्नागिरीकडे होणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणात आंबा घाटातून होते. चाेवीस तास या घाटातून वाहतूक सुरू असते. या घाटातून होणारी वाहतूक लक्षात घेता बांधकाम खात्याकडून मात्र घाट रस्त्याच्या दुरूस्तीकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे प्रवाशांचे व स्थानिकांचे मत आहे. या घाटामध्ये साखरपापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा तयार झाला होता. बांधकाम खात्याकडून या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या ठिकाणांहून वाहने जाऊ नयेत, यासाठी या ठिकाणी डेली नेटर्स बसविण्यात आले आहेत. दुरूस्त केलेल्या या खड्डय़ाच्या जवळपासचा भागही अन्य रस्त्याच्या तुलनेत काही प्रमाणात खचल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी हा सर्वच रस्ता बांधकाम खात्याच्या माध्यमातून दुरूस्त होणे आवश्यक असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत बांधकाम खात्याने या खड्ड्याची तत्काळ दुरूस्ती केल्याबद्दल प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
-----------------------------------
काेकण व पश्चिम महाराष्ट्राला जाेडणाऱ्या आंबा घाटात पडलेल्या खड्डयाची दुरूस्ती करण्यात आली असून, दुरुस्त केलेल्या खड्डय़ाच्या ठिकाणी डेली नेटर्स बसविण्यात आला आहेत. (छाया : सागर पाटील)