लोटेतील चौपदरीकरणाचे काम पुन्हा वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:17 PM2020-01-14T16:17:27+5:302020-01-14T16:18:52+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथील चौपदरीकरणाचे काम पुन्हा एकदा वादग्रस्त बनले आहे. या कामाची खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चालू असलेले काम तूर्तास थांबविण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

Repeat the work of quadruplication in Lot | लोटेतील चौपदरीकरणाचे काम पुन्हा वादात

लोटेतील चौपदरीकरणाचे काम पुन्हा वादात

Next
ठळक मुद्देसुनील तटकरेंच्या काम थांबवण्याच्या सूचना अंडरपास, ओव्हरपास करण्याची मागणी

आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथील चौपदरीकरणाचे काम पुन्हा एकदा वादग्रस्त बनले आहे. या कामाची खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चालू असलेले काम तूर्तास थांबविण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

लोटेतील शिवसृष्टी सभागृहात झालेल्या बैठकीत तटकरे यांनी याबाबत सूचना केल्या. लोटे परिसरातील भौगोलिक परिस्थिती, औद्योगिक वसाहत, महामार्गालगत असलेली व्यापारी व नागरी वसाहत, परिसरातील शैक्षणिक संस्था तसेच विद्यार्थ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने पटवर्धन लोटे येथे अंडरपास किंवा ओव्हरपास होणे अपरिहार्य आहे.

त्यादृष्टीने योग्य तो पर्याय शोधून नवीन आराखडा तयार करण्यात यावा आणि तोपर्यंत येथील काम तूर्तास थांबवावे, अशा सूचना सुनील तटकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. लोटेतील चौपदरीकरण कामाची तटकरे यांनी प्राधिकरणाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासनासह प्रत्यक्ष पाहणी केली व जिथे जिथे गरज असेल, तिथे योग्य तो बदल करून नवीन आराखडा तयार करण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानंतर वरील सर्व यंत्रणांचे अधिकारी व नागरिक यांच्या संयुक्त बैठकीत बोलताना तटकरे म्हणाले की, कोकणी माणूस विकासाच्या विरोधात नाही. परंतु, त्यांचे दैनदिन जीवन आणि व्यवहार अस्ताव्यस्त होत असतील तर माझ्यासारखा लोकप्रतिनिधी हे होऊ देणार नाही.

इथे आवश्यक असणाऱ्या सुविधा द्या. महामार्गावरून लगतच्या व्यापारीपेठेत मालाच्या गाड्यांची ये-जा झाली पाहिजे, अंडरपास किंवा ओव्हरपास याठिकाणी आवश्यक आहे. तो व्हावा यासाठी सरकार दरबारी जे काही सहकार्य लागेल ते मी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नक्की करेन.

एमआयडीसीने जमीन मालकांच्या सातबाऱ्यावर असलेला बोजा उतरवून त्यांना त्यांचा मोबदला मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. पुन्हा नवीन आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आठ दिवसात बाकीच्या सूचनांचा अभ्यास करून नवीन आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगितले. तटकरे यांच्या सूचनेमुळे आता याठिकाणी नव्याने कामाला सुरूवात होणार आहे.

यावेळी नागरिक व व्यापाऱ्यांच्या वतीने डॉ. प्रशांत पटवर्धन, सुरेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, खेडचे माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे, पंचायत समिती सदस्य जीवन आम्ब्रे यांनी तर प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.


 

Web Title: Repeat the work of quadruplication in Lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.