प्रश्नपत्रिकाप्रकरणी अहवाल
By Admin | Published: March 16, 2015 11:17 PM2015-03-16T23:17:49+5:302015-03-17T00:12:54+5:30
कोकण शिक्षण मंडळ : गोपनीय प्रेसकडून हलगर्जीपणा झाल्याचा सूर
टेंभ्ये : कोकण विभागीय शिक्षण मंडळांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इ. १० वी व १२ वी परीक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षी चिपळूण व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी पडलेल्या प्रश्नपत्रिका प्रकरणी विभागीय मंडळाने राज्य मंडळाला अहवाल सादर केला आहे. एकंदरीत गोपनीय प्रेसकडून झालेल्या हलगर्जीपणाबद्दल कोकण विभागीय मंडळात नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परिक्षेमुळे कोकण विभागीय शिक्षण मंडळ चर्चेत आले आहे. दोन्ही परिक्षांमध्ये दोन ठिकाणी पेपर कमी आल्याने त्याठिकाणी झेरॉक्सच्या प्रती वाटण्यात आल्या होत्या. चिपळूण व रत्नागिरी या ठिकाणी हिंदी संयुक्तच्या रॅपरमध्ये हिंदी पूर्णच्या प्रश्नपत्रिका आढळल्याने हिंदी संयुक्तच्या प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून संबंधि केंद्रावरील परीक्षा विलंबाने सुरु करावी लागली. असाच प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही केंद्रावर भूमितीच्या पेपरला झाला. याठिकाणी भूमिती इंग्रजी माध्यमाच्या रॅपरमध्ये मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आढळल्याने या ठिकाणीदेखील झेरॉक्स काढून आवश्यक प्रश्न पत्रिकांचा पुरवठा करावा लागला. या दोन्ही परिस्थितीमध्ये पेपर उशीरा का करावे लागलेत याची सविस्तर कारणे नमूद करण्यात आली आहे. संबंधित केंद्र संचालक, परीरक्षक यांचा अहवाल घेवून त्या आधारे विभागीय मंडळाने वस्तूस्थितीदर्शक अहवाल राज्य मंडळाकडे पाठवण्यात आला आहे.प्रश्नपत्रिका कमी पडलेल्या प्रकरणामध्ये गोपनीय प्रेसकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत संबंधित प्रेसवर कारवाई करण्याचा अधिकार राज्य मंडळाला आहे.
राज्य मंडळ या प्रेसवर उचित कारवाई निश्चितपणे करेल असा विश्वास विभागीय सचिव आर. बी. गिरी यांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकारात विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रशासनाला त्रास सहन करावा लागला याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. (वार्ताहर)
वेळ वाढवून दिला...
दोन्ही प्रकरणामध्ये गोपनीय प्रेसमधून आलेल्या सीलबंद पाकिटावरील मजकूर व आतील प्रश्नपत्रीका यामध्ये तफावत आढळल्याचे स्पष्ट होत आहे. प्रश्नपत्रीकांची सिलबंद पाकिटे ही परीक्षा केंद्रावरच उघडली जातात. ही पाकिटे उघडण्याचा अधिकार विभागीय मंडळाला नसल्याने हा प्रकार विभागीय मंडळात निदर्शनास येणे अशक्य असल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. प्रश्नपत्रीका कमी पडल्याने झेरॉक्स काढण्यासाठी वेळ द्यावा लागला. नियमानुसार तातडीची पर्यायी व्यवस्था करुन आवश्यकतेनुकसार विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
गोपनीय प्रेसच्या कामकाजाबाबत नाराजी.
केंद्र संचालक व परीरक्षकांच्या अहवालाचा वापर.
दहावी, बारावी परिक्षांमुळे ोकण विभागीय शिक्षण मंडळ चर्चेत.
झेरॉक्स पेपरचा विषय गाजला.