साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण स्थगित
By संदीप बांद्रे | Published: February 28, 2023 03:28 PM2023-02-28T15:28:27+5:302023-02-28T15:28:57+5:30
जलप्रदूषण व जमिन मातीचे प्रदूषण होत असल्याचा उपोषणकर्त्यांकडून आरोप
चिपळूण : कंपनीचे दूषित पाणी उघड्यावर सोडले जात असताना आणि तक्रार करूनही कोणती कारवाई होत नसल्याने गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी कंपनीला यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यानुसार लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे तूर्तास हे उपोषण स्थगित केले आहे.
साफयिस्ट कंपनीच्या मागील बाजूस कंपनीने दूषित पाणी खाजगी प्लॉट खरेदी करुन जमिनीत मुरवीत आहेत. त्यामुळे जलप्रदूषण व जमिन मातीचे प्रदूषण होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०१९ रोजी अशाच प्रदूषणाबाबत आमरण उपोषण करण्यात आले होते. पुन्हा कंपनीने तसेच प्रदूषण चालू केल्याचे फोटो व शूटींग सहित पुरावे देखील आपल्याकडे असल्याचे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष मुझफ्फर ऊर्फ राजेश मुल्लाजी दावा करीत आहेत.
यासंदर्भातील तक्रार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास एक महिन्यापूर्वी करण्यात आली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाही केली नसल्यामुळेच सोमवारपासून उपोषण सुरु केले होते. अखेर लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.