रेस्क्यू सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:35 AM2021-09-06T04:35:36+5:302021-09-06T04:35:36+5:30
शेतविहीर ढासळली देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली-रेवाळवाडी येथील प्रताप गोविंद रेवाळे यांची शेतविहीर ढासळली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान ...
शेतविहीर ढासळली
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली-रेवाळवाडी येथील प्रताप गोविंद रेवाळे यांची शेतविहीर ढासळली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून, तेथील पाच ते सहा कुटुंबांचा पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेरा वर्षांपूर्वी जवाहर योजनेंतर्गत ही शेतविहीर उभारण्यात आली होती.
नूतन सभागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभागृह हे जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीला कमी पडत असल्याने याच आवारातील कै. शामराव पेजे सभागृहाच्यावरती नवीन सभागृह बांधण्यात आले आहे. हे सभागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
खड्डे भरण्यास प्रारंभ
लांजा : शहरातून गेलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन महामार्ग विभागाकडून खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
उपोषणाचा इशारा
रत्नागिरी : शहराची खराब रस्त्यांमुळे झालेली बकाल अवस्था, त्यामुळे नागरिकांना सोसावा लागणारा मानसिक, शारीरिक त्रास लक्षात घेत रत्नागिरी महिला काॅंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नगर परिषदेसमोर महिला काॅंग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
अर्चना वाघमळे यांची बदली
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांची सातारा येथे बदली झाली आहे. वाघमळे यांनी जुलै २०१९मध्ये पदाची सूत्रे हाती घेतली होती. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती.
कडवईत रेल्वे थांबणार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यात कडवई येथे उभारण्यात आलेल्या नवीन रेल्वे स्थानकावर दि. ७ जुलै रोजी पहिल्यांदाच रेल्वे थांबणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे थांबणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
कृती आराखडा
रत्नागिरी : जिल्ह्यातील नगर पंचायती व नगर परिषदांच्या पुढील स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. शून्य कचरा व रस्ते दत्तक योजनेची अंमलबजावणी केली आहे. यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नगर प्रशासनांतर्गत असलेल्या १,५०५ किलोमीटर रस्त्यांपैकी १०८ किलोमीटरचे मुख्य रस्ते असून, यातील जास्तीत जास्त रस्ते या योजनेंतर्गत दत्तक देण्याचा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे.
कचरा साफ करण्याची मागणी
खेड : भरणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिवनेरी नगर भागातील पाटीदार भवनजवळ साचलेला कचऱ्याचा ढिगारा साफ करण्याची मागणी होत आहे. कचऱ्याचा ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पोलिसांकडून कारवाई
रत्नागिरी : शहरातील मुख्य मार्गावर शहर पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू आहे. विनाहेल्मेट, विना कागदपत्र शिवाय नियमबाह्य वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांना हेरून कारवाई करण्यात येत आहे. शहरात हेल्मेट सक्तीचे असतानाही अंतर्गत मार्गावरून वाहने हाकताना हेल्मेटचा वापर टाळला जात आहे.