डोर्लेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

By शोभना कांबळे | Published: March 6, 2024 11:33 PM2024-03-06T23:33:30+5:302024-03-06T23:33:41+5:30

बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी  करता विहिरीमध्ये पाण्याच्या पाईपला पकडून बसल्याचे दिसून आले. 

Rescue of a leopard that fell into a well in Dorlet | डोर्लेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

डोर्लेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी : डोर्ले (ता. रत्नागिरी), ब्राम्हणवाडी  येथे बुधवार,दि.०६ रोजी विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात रत्नागिरी वन परीक्षेत्राला यश आले. बुधवारी सकाळी ७.३० वाजणेच्या सुमारास समीर नारायण तोडणकर यांच्या घराशेजारील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावचे सरपंच अजय तोडणकर, यांनी दुरध्वनीद्वारे वन विभागाला दिली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी  करता विहिरीमध्ये पाण्याच्या पाईपला पकडून बसल्याचे दिसून आले. बिबट्या हा भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  विहीर समीर नारायण तोडणकर यांच्या घराच्या शेजारी असून ती १५ फूट व्यास, कटडा नसलेली, ५० फूट खोल, बांधकाम नसलेली आहे. 
 
विहीरीमध्ये पिंजरा दोरीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीमध्ये सोडल्यानंतर अर्ध्या तासामध्ये बिबट्याला सुस्थितीत पिंजऱ्यामध्ये घेण्यात आले. विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी  काळगे (झाडगाव, रत्नागिरी) यांनी पाहणी केली.  बिबट्या हा मादी प्रजातीचा असुन त्याचे वय साधारणपणे ३ ते ३.५ वर्षाचे असावे.तपासणी झाल्यानंतर बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री झाल्याने वन विभागाच्या बचाव पथकाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

वन विभागाचे बचाव पथकामध्ये प्रकाश सुतार (वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी),  न्हानू गावडे (वनपाल पाली), प्रभू साबणे, (वनरक्षक रत्नागिरी), मिताली कुबल (वनरक्षक  जाकादेवी), व रेस्क्यू बचाव पथकामध्ये पोलीस पाटील, डोरले गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, प्राणीमित्र  कल्पेश डोंगरे, विष्णुदास गुरव, अनिकेत मोरे, दिनेश चाळके यांनी सहकार्य करत बिबट्याला स्थानिक व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.

बचाव पथकाला विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे, यांचे मार्गदर्शन लाभले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्री  क्रमांक.१९२६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Rescue of a leopard that fell into a well in Dorlet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.