Ratnagiri: राजापुरात तारेत अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:59 AM2024-06-27T11:59:30+5:302024-06-27T12:00:00+5:30
राजापूर : आंबा कलमाच्या बागेत लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका करण्यात राजापूर वन विभागाला यश आले. राजापूर ...
राजापूर : आंबा कलमाच्या बागेत लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका करण्यात राजापूर वन विभागाला यश आले. राजापूर तालुक्यातील कुवेशी येथे बुधवारी ही घटना घडली असून, वन विभागाने ब्लॅक पॅंथरला पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात साेडले.
कुवेशी येथे हर्षद हरेश्वर मांजरेकर यांच्या आंबा कलम बागेच्या संरक्षक भिंतीला लावलेल्या तारेच्या कुंपणात ब्लॅंक पॅंथर अडकला हाेता. बुधवारी हा प्रकार लक्षात येताच पद्मनाथ ऊर्फ पिंट्या कोठारकार यांनी राजापूर परिमंडळ वन अधिकारी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर ही घटना रत्नागिरीच्या परिक्षेत्र वन अधिकारी यांना सांगितले. त्यानंतर राजापूरचे वनपाल, वनरक्षक व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन तारेत अडकलेल्या बिबट्याला मुक्त केले.
या ब्लॅक पॅंथरला सुस्थितीत पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर राजापूरचे पशूवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे व पशुधन विकास अधिकारी प्राजक्ता बारगे यांनी त्याची तपासणी केली. हा ब्लॅक पॅंथर सुस्थितीत असल्याची खात्री करून राजापूर वनविभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. हा ब्लॅक पॅंथर नर जातीचा असून, त्याचे वय सुमारे पाच ते सहा वर्ष असल्याचे वनविभागाने सांगितले.
विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, पालीचे वनपाल न्हानू गावडे, राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू साबणे व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, नीतेश गुरव, संतोष चव्हाण, नीलेश म्हादये यांनी या माेहिमेत सहभाग घेतला हाेता.
वन विभागाशी संपर्क साधा
जिल्ह्यात काेठेही अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाच्या रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी केले आहे.