Ratnagiri: गुहागरात गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या पाचजणांना वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:45 PM2024-09-14T12:45:14+5:302024-09-14T12:45:38+5:30

गुहागर : येथील समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षारक्षकांनी वाचवले. समुद्रात दोरखंड टाकून या ...

Rescued five people who were drowning during Ganesh immersion in Guhagar | Ratnagiri: गुहागरात गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या पाचजणांना वाचवले

Ratnagiri: गुहागरात गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या पाचजणांना वाचवले

गुहागर : येथील समुद्रकिनारी विसर्जनासाठी समुद्रात गेलेले पाच तरुण बुडत असताना गुहागर नगरपंचायतीच्या सुरक्षारक्षकांनी वाचवले. समुद्रात दोरखंड टाकून या सुरक्षारक्षकांनी या पाचजणांना वाचवले. ही घटना गुरुवारी सायंकाळी गौरी-गणपती विसर्जनाप्रसंगी घडली. गुहागर नगरपंचायतीचे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्षकांमळे माेठा अनर्थ टळला.

गुरुवारी १२ सप्टेंबरला सायंकाळी दुर्गादेवी वाडीतील गौरी-गणपतीची मिरवणूक दुर्गादेवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. भक्तिभावाने गौरी-गणपतीची समुद्रावर सामूहिक आरती झाली. त्यानंतर एकेकजण गणपतीची मूर्ती घेऊन समुद्रात विसर्जनासाठी जाऊ लागले. गणेश मूर्तींचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच पाच तरुण एका लाटेने खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावरुन समुद्राचे निरीक्षण करणाऱ्या आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधून तो खोल समुद्रात भिरकावला. समुद्रात अडकलेल्या तरुणांसाठी ती आयुष्याची दोरी ठरली.

प्रथम दोरखंडाला बांधलेला बोया दोघांच्या हाती लागला. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी या दोन तरुणांची धडपड सुरु होती. त्याचवेळी आणखी एक लाट आली आणि उर्वरित तीन सहकारीही बोयाच्या जवळ आले. पण तोपर्यंत बोयाला बांधलेला दोरखंड समुद्रात जाऊ लागला. किनाऱ्यावरुन दोरखंड ओढणारे चार पाच सहकारी जवळपास छातीभर पाण्यात लाटा झेलत उभे होते.

जीवनमरणाच्या हिंदोळ्यावरचा हा काही क्षणांचा खेळ किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्वांचेच प्राण कंठाशी आणत होता. तितक्यातच आणखी १० - १२ जणांनी धावत जाऊन खोल समुद्रात जाणारा दोरखंड पकडला. त्यानंतर सर्वजण किनाऱ्यावर सुखरुप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आशिष सांगळे व जगन्नाथ घोरपडे या दोन सुरक्षारक्षकांचा नगरपंचायतीने शुक्रवारी सत्कार केला.

Web Title: Rescued five people who were drowning during Ganesh immersion in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.