आंबा पिकावरील फूलकिडे नियंत्रणासाठी संशोधन सुरू : डॉ. व्ही. एन. जालगावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:52 PM2024-09-30T12:52:27+5:302024-09-30T12:52:27+5:30
रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत ...
रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत नाही. तुडतुडे आणि फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सुरू असून, लवकरच योग्य उपाययोजनाबाबतची माहिती बागायतदारांना देऊ, असे आश्वासन डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख डाॅ. व्ही. एन. जालगावकर यांनी दिले.
रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे रविवारी आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डाॅ. जालगावकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ. महेश कुलकर्णी, जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, मंदार सरपोतदार उपस्थित होते.
डाॅ. जालगावकर यांनी सांगितले की, अति कीटकनाशकांचा वापर, सातत्याने कीटकनाशकांची फवारणी, दोन ते तीन कीटकनाशक एकाचवेळी वापरल्यामुळे कीडरोग नियंत्रणात येत नाही. काही ठिकाणी थ्रीप्स आटोक्यात आला नाही किंवा त्याने नुकसानही केल्याचे दिसले नाही. फूलकिडे नियंत्रणाबाबत सध्या विद्यापीठात संशोधन सुरू आहे. गतवर्षीच्या हंगामात काही आंबा बागेत प्रात्यक्षिके घेण्यात आली. १५ दिवसांच्या फरकानंतर विशिष्ट कीटकनाशकांच्या फवारण्या करण्यात आल्या. काही झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचेल, असे कीटकनाशक पाण्यातून देण्यात आली. त्याचा वापर प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले. फळमाशीसाठी रक्षक सापळा वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
डाॅ. महेश कुलकर्णी म्हणाले की, आंबा बागेतील प्रत्येक झाडाच्या पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे. योग्य उष्णता असेल, तर झाडावरील कीडरोगाचे प्रमाण कमी होईल. अन्यथा वेळच्या वेळी फांद्यांची छाटणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात बागायतदारांना फवारणीसाठी ड्रोनचा वापर करून त्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मंदार सरपोतदार यांनी या कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.
गोगलगायींचा प्रादुर्भाव
सध्या गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याबाबतचेही संशोधन पूर्णत्वाकडे असल्याचे डाॅ. जालगावकर यांनी सांगितले. सध्या तरी गोगलगायी एकत्र करून युरियाच्या पाण्यात टाकण्याची सूचना त्यांनी केली.