आरक्षण व पदोन्नती आमचा संविधानिक हक्क : सुधाकर कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:24+5:302021-06-29T04:21:24+5:30
रत्नागिरी : शासनाने अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांचे नोकरीतील पदाेन्नती आरक्षण बंद करुन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलल्याने ...
रत्नागिरी : शासनाने अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांचे नोकरीतील पदाेन्नती आरक्षण बंद करुन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक अधिकार डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्याच्या ठिकाणी सुधाकर कांबळे यांचे नेतत्वाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या निदर्शन व आंदोलनामध्ये आरक्षण व पदोन्नती आमचा संविधानिक हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच, असे अध्यक्षीय मार्गदर्शनात सुधाकर कांबळे यांनी शासनाला फर्मावलं आहे.
ते पुढे म्हणाले, शासनाने अध्यादेश काढून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण बंद करुन घटनात्मक अधिकार डावलले आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना स्मरुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. मागसवर्गीय समाजाला राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण बहाल केले. तो दिवस आरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा शाखेने पदोन्नतीमधील आरक्षण देण्याबाबत निदर्शन आंदोलन करून आपली रास्त मागणी केली आहे.
ही आंदोलने रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मंडणगड - शांताराम पवार, प्रमाेद जाधव, दापोली - उमेश मर्चंडे, चंद्रमणी महाडिक, बिपीन मोहिते, खेड - अशोक मानकर, विलास शिंदे, चिपळूण - मनोज पवार, देवीदास शिंदे, सुनील सुर्वे, गुहागर - सुहास गायकवाड, सुधाकर कांबळे, संगमेश्वर - प्रमोद पवार, दिलीप तांबे, रत्नागिरी - संजय तांबे, पोतदार सर, लांजा - शिवाजी कांबळे, संतोष पडवणकर, एस. पी. भालशंकर, प्रभाकर शिंगये, राजापूर - प्रमोद जाधव, भारत कांबळे यांनी यशस्वी केली.
या निदर्शन आंदोलनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. बी. आर. चव्हाण, महासंघाचे सरचिटणीस मोहन कांबळे, खजिनदार संतोष गमरे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गोपाळ कांबळे, माध्यमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, जिल्हा संघटक राजेश गमरे, डॉ. हरिष धमगये, वासुदेव वाघे, नगर परिषदचे किरण मोहिते, आराेग्य विभागाचे विजय जाधव, पाटबंधारे विभागाचे सुरेश कांबळे सहभागी झाले होते.