गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल; चाकरमान्यांच्या नजरा विशेष गाड्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:16+5:302021-07-14T04:37:16+5:30
खेड : गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर मध्य व कोकण रेल्वेने चार गणपती स्पेशल गाड्यांच्या ...
खेड : गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर मध्य व कोकण रेल्वेने चार गणपती स्पेशल गाड्यांच्या तब्बल ७२ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेऊन, गणेशभक्तांना सुखद धक्काच दिला हाेता. मात्र, या साऱ्या गाड्या फुल्ल झाल्याने पुन्हा पदरी निराशा पडली आहे.
गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच चाकरमान्यांची झुंबड उडून चारही स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. या गाड्यांची प्रतीक्षा यादी ३०० वर पोहोचली आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या नजरा पुन्हा विशेष गाड्यांकडे रोखल्या आहेत.
गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावी येणाऱ् या चाकरमान्यांना क्वारंटाईनची सक्ती करण्यात आल्याने साऱ्यांनी गावाकडे पाठ फिरवली होती. गतवर्षी गणरायाच्या दर्शनाची हुकलेली संधी भरून काढण्यासाठी चाकरमान्यांची पावले आरक्षण खिडक्यांकडे वळली. गत महिन्यात नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल होऊन, चाकरमानी प्रतीक्षा यादीवर राहिले होते. यामुळे यंदा गणेशोत्सवात गाव गाठायचे कसे, याचीच चिंता चाकरमान्यांना सतावत होती. रेल्वे प्रशासनाने आठवडाभरापूर्वीच कोकण मार्गावर सीएसएमटी - सावंतवाडी, सीएसएमटी - रत्नागिरी, पनवेल - सावंतवाडी, पनवेल - रत्नागिरी या ४ गणपती स्पेशल गाड्यांच्या ७२ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गणपती स्पेशल गाड्या ५ सप्टेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण खुले होताच आरक्षित तिकिटांसाठी चाकरमान्यांची झुंबड उडाली. अवघ्या एका दिवसातच सर्वच गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
५ सप्टेंबरला धावणाऱ्या सीएसएमटी - सावंतवाडी गणपती स्पेशलच्या शयनयान श्रेणीतील ९०, ७ सप्टेंबरच्या स्पेशलमधील ३६५, तर ९ सप्टेंबरमधील ४०० जण प्रतीक्षा यादीवर आहेत. ७ सप्टेंबरच्या आसन श्रेणीसाठी २६० जण प्रतीक्षा यादीवर असून ८ व ९ सप्टेंबरला धावणाऱ्या स्पेशल गाडीचे तिकीट उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. ७ सप्टेंबरपासून धावणाऱ्या पनवेल - सावंतवाडी गणपती स्पेशलचे प्रवासी प्रतीक्षा यादीवर आहेत. आसन श्रेणीतील प्रतीक्षा यादी १९० वर पोहोचली असून ८ सप्टेंबरच्या गणपती स्पेशलची प्रतीक्षा यादी ३०० च्या आसपास आहे. अन्य दोन गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे.