आरक्षणाचा गुंता संयमाने, चर्चेने सोडवणे आवश्यक

By admin | Published: September 25, 2016 12:48 AM2016-09-25T00:48:38+5:302016-09-25T00:48:38+5:30

श्रीपाल सबनीस : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मांडली अभ्यासाची गरज

Reservation of the reservation requires patience, solving negotiations | आरक्षणाचा गुंता संयमाने, चर्चेने सोडवणे आवश्यक

आरक्षणाचा गुंता संयमाने, चर्चेने सोडवणे आवश्यक

Next

रत्नागिरी : जातीची भूमिका घेऊन येणारे मोर्चे हे जातीवादी नाही तर वेदनेचे आहेत. त्यामध्ये मातीची वेदना आहे. ही वेदना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. मौनातून बोलणारा शिवाजी महाराजांचा मावळा गांधीवादीप्रमाणे व्यक्त होत आहे. ही विस्फोटक शांतता असून, सरकारने या मौनामागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. सरकारने जे-जे मागास आहेत, त्यांचे दु:ख दूर करणे आवश्यक आहे. सरकारने आरक्षणाचा गुंता शांत, संयमाने बसून, चर्चा करून वास्तवातील चुकलेलं गणित सुधारून, राज्य घटनेतील कलमांचा विचार करून सोडविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.
मराठा समाजाच्या मागणीमुळे मागासवर्गीयांमध्ये असुरक्षितता व अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकसंघ महाराष्ट्राचा चेहरा यातून विद्रुप होऊ पाहात आहे. त्यामुळे आरक्षणावर अभ्यासपूर्वक निर्णय घेणे उचित राहिल. त्यामुळे लोकशाहीला पूरक असलेली मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका योग्य असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.
वाद हा मानवाचा स्वभाव, स्थायीभाव आहे. व्यक्ती व जाती व्यवस्थेवर होणारे वाद वांझ आहेत. वादातून सत्य बाहेर येत असेल तर निश्चितच चांगले आहे. लोकशाही मार्गाने संमेलन अध्यक्षपदी निवडून आल्यावर हास्यास्पद आरोप करणे, बदनाम करणे चुकीचे आहे. ब्राम्हण समाजात जन्म घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर पीएचडी करून आंबेडकर चळवळीत आयुष्य घालविणाऱ्यावर अ‍ॅक्ट्रॉसिटी करण्यात आली, झाली नाही ती वेगळी गोष्ट. माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर मी आता केस दाखल केली असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले. संमेलन अध्यक्ष निवड प्रक्रियेत त्रुटी असून, त्यामध्ये बदल आवश्यक आहेत. महामंडळात जुनी, जाणकार साहित्यिक मंडळी आहेत. संमेलने म्हणजे अखिल भारतीय पातळीवरचा उत्सव आहे. गेली अनेक वर्षे संमेलने होत आहेत. संमेलन कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली आहेत. अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्याचा गैरवापर केला जात असेल तर सर्वेक्षण होऊन त्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समाज व सरकार इंग्रजी शाळांच्या फेव्हरमध्ये असल्यानेच इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. मातृभाषेचे महत्त्व अन्य राज्यांनी जपले आहे. मराठी भाषेबाबतही असेच आग्रह असणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाची गेल्या ८० वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मराठी जपली गेली पाहिजे. डॉ. सबनीस यांनी साहित्य निर्मितीत तरूणाईचा सहभाग चांगला असल्याचे सांगून, सोशल मीडियावरील साहित्य विकृत नसल्याचे मत व्यक्त केले. सोशल मीडियावर वादविवाद, चर्चा, कविता रोज सुरू आहेत. हे एक प्रकारचे संमेलनच म्हणावे लागेल. परंतु, कौर्य, असहिष्णूता, असभ्यता टाळण्याचे भान मात्र सांभाळणे आवश्यक असून, त्यासाठी वयस्क मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
राज्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठे असूनदेखील शेतकरी आत्महत्या गंभीर असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Reservation of the reservation requires patience, solving negotiations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.