इच्छुकांच्या प्रभागात महिलांना आरक्षण जाहीर
By admin | Published: November 12, 2014 10:06 PM2014-11-12T22:06:13+5:302014-11-12T22:50:10+5:30
लांजा नगरपंचायत : उमेदवारीची स्वप्ने पाहणारे अनेकजण ‘नाउमेद’
लांजा : येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वॉर्डप्रमाणे आरक्षण काय पडणार, या विषयीची लांजावासीयांची शिगेला पोहोचलेली उत्कंठा आज आरक्षणाची सोडत काढल्यानंतर संपली आहे. मात्र, गुडघ्याला बाशिंग बांधून आपण नगरपंचायतीचे भावी उमेदवार असल्याची स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या स्वप्नावर आरक्षणाचे पाणी फेरले गेले आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता लांजा सांस्कृतिक भवन येथे प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले. राजापूर-लांजाचे प्रांत सुशांत खांडेकर यांनी हे आरक्षण जाहीर केले. यावेळी तहसीलदार दशरथ चौधरी, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, विजय दांडेकर, काका कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला प्रभाग क्र.७ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या प्रभागाची चिठीद्वारे सोडत काढण्यात आली. शाळा नं. ५ची विद्यार्थिनी शीतल सरवदे हिने एक चिठी काढली आणि हा प्रभाग अनुसूचित जातीच्या स्त्रीसाठी राखीव झाला.
या प्रभागात शेट्येवाडी, बौद्धवाडी, सनगरवाडी अशा वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या आरक्षित प्रभागामुळे लांजा बौद्धवाडीला पहिल्यांदा नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ५ जागांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चिठीद्वारे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षणाची चिठी तेजल तेंडुलकर या विद्यार्थिनीने काढली.
यामध्ये प्रभाग क्र. ६ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री झाला. या प्रभागात जुनी बाजारपेठ, रोहिदासवाडी यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग क्र.१० मध्ये कुरूपवाडी, नाईकवाडी, प्रभाग ११मध्ये नवीन बाजारपेठ असा समावेश आहे. प्रभाग क्र.१० व ११ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव झाले आहेत. प्रभाग क्र.१२ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रभागात कनावजेवाडी, गोंडेसखल आदी वाड्यांचा समावेश आहे. प्रभाग क्र.१५मध्ये गुरववाडी, वारिशेवाडी, निवधेवाडी आदी वाड्या आहेत. हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर सर्वसाधारण स्त्री राखीवसाठी ५ जागांचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये प्रभाग क्र.१मध्ये बोरवाडी, डाफळेवाडी, कुक्कुटपालन, कुंभारवाडी, प्रभाग क्र.३मध्ये मधली कुंभारवाडी, उपशेट्येवाडी, पानगलेवाडी, लिंगायतवाडी, प्रभाग क्र.९मध्ये न्हावीवाडी, शेवरवाडी, भटवाडी, कोत्रेवाडी, प्रभाग क्र.१४ मध्ये रेस्ट हाऊस आदी, तर उर्वरित ६ जागा या सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्या. यामध्ये प्रभाग क्र.२ मध्ये सुतारवाडी, धुंदरेगाव, पुरातवाडी, प्रभाग क्र.५ मध्ये तेलीवाडी, मुजावरवाडी, प्रभाग क्र. ८मध्ये आगरगाव, देवराई, प्रभाग क्र.१३ धावळेवाडी, खावडकरवाडी, प्रभाग क्र. १६मध्ये पुरागाव बौद्धवाडी, मुस्लिमवाडी, मावळतवाडी, प्रभाग क्र.१७ मध्ये उगवतवाडी आदी वाड्या आणि गावांचा समावेश करण्यात आला आहे.
नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडून येणार आहे. एकूण १७ प्रभागात १७ नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. या १७ नगरसेवकांपैकी महिला ५० टक्के आरक्षण असल्याने ९ संख्या महिलांची असणार आहे तर पुरुषांची ८ संख्या असे बलाबल राहणार आहे.
लांजा नगरपंचायतीत एकूण १७ नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रभाग रचना करताना प्रत्येक वाडीचा विचार केल्याचे दिसून येत आहे. प्रभागात ६३८ पासून १३०० मतदार असलेले प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
आज प्रभाग रचना व आरक्षण सोडत होणार असल्याने सभागृहात मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. प्रभागवार आरक्षणाची सुरुवात झाली. स्त्री राखीव आरक्षण पडत असल्याने अनेकांनी आपण नगरसेवक होणार अशी मनामध्ये स्वप्न रंगवली होती, त्यांची स्वप्न धुळीस मिळाली. तसेच गुडघ्याला बाशिंग बांधून राहिलेल्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. आपल्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने अनेकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे ते उपस्थितांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांचा चेहराच सर्वकाही सांगून जात होता. (प्रतिनिधी)