संचितला ‘बालस्वास्थ सुरक्षा’ने दिले नवजीवन-: अंगणवाडी सेविकेच्या तत्परतेमुळे वेळीच मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:48 PM2018-11-21T16:48:39+5:302018-11-21T16:49:53+5:30
दुर्मिळ आणि हृदयाचा अत्यंत क्लिष्ट आजार असलेल्या खेड तालुक्यातील सवेणी गावातील संचित संजय निकम या तीन वर्षाच्या चिमुरड्याला अखेर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’तर्गत नवीन जीवन मि
खेड : दुर्मिळ आणि हृदयाचा अत्यंत क्लिष्ट आजार असलेल्या खेड तालुक्यातील सवेणी गावातील संचित संजय निकम या तीन वर्षाच्या चिमुरड्याला अखेर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’तर्गत नवीन जीवन मिळाले.
संचित याला जन्मताच हृदयाचे चार क्लिष्ट व दुर्मिळ रोग जडले होते. त्याच्या हृदयाच्या रक्त्त वाहिन्या जन्मत:च चुकीच्या ठिकाणी प्रत्यारोपित झाल्या होत्या. हृदयाच्या झडपाना दोन छिद्र्रे होती. त्याच्या हृदयाची जी नलिका जन्मानंतर बंद होणे गरजेची होती, ती उघडीच होती. अत्यंत क्लिष्ट अशी परिस्थिती घेऊन संचितचा जन्म झाला होता. अतिशय दुर्मिळ असा आजार घेऊन जन्माला आलेल्या संचित निकम या ३ वर्षीय चिमुरड्याला राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रमांतर्गत नवीन जीवन मिळाले. तालुक्यातील सवेणी येथील संजय निकम हे रोजगारासाठी मुंबई येथे आपल्या कुटुंबियांच्या उदरनिवार्हासाठी मोलमजुरीचे काम करतात.
संचितवर उपचार करण्यासाठी वडिलांनी मुंबई येथील अनेक रुग्णालयात दाखवले मात्र लाखोंचा खर्च असलेली शस्त्रक्रिया आर्थिकदृष्टया त्यांना परवडणारी नव्हती. हतबल झालेल्या कुटुंबियांचा संपर्क गावातील अंगणवाडी सेविका शिंदे यांच्याशी झाला. त्यांनी या संदर्भात प्राथमिक माहिती घेऊन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगावकर यांच्याशी संपर्क साधला.
डॉ. संजीव धारिया, डॉ. सावन, डॉ. पालकर, डॉ वाघमारे यांनी संचितवर कराव्या लागणाºया शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेतले. यानंतर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’अंतर्गत मुंबई येथील हाजीअली येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये १३ नोव्हेंबर रोजी यशस्वी आणि पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण भागात तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया एका अंगणवाडी सेविकेने दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे संचितवर यशस्वी व मोफत उपचार योग्यवेळी होण्यास मदत झाली.