'मनसे'च्या कार्यकारिणीत फेरबदल; रत्नागिरीतील राजापुरात नवनियुक्तीवरून फूट, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By अरुण आडिवरेकर | Published: July 4, 2023 07:03 PM2023-07-04T19:03:31+5:302023-07-04T19:03:47+5:30
नव्या कार्यकारिणीवरून मनसेमध्ये नाराजी
राजापूर : तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल केल्यानंतर मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष अजिम जैतापकर यांच्या पाठोपाठ आणखी आठ पदाधिकाऱ्यांनी साेमवारी (३ जुलै) आपले राजीनामे दिले आहेत. त्यामुळे नव्या कार्यकारिणीवरून मनसेमध्ये नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसेच्या तालुकाध्यक्षपदी पंकज पंगेरकर यांची नियुक्ती करताना विद्यमान तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव यांची राजापूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या फेरबदलानंतर मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष जैतापकर यांनी काही दिवसांनंतर आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोमवारी मनसेच्या तब्बल आठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे नूतन तालुकाध्यक्षांकडे सादर केले आहेत.
राजीनामा दिलेल्यांमध्ये उपतालुकाध्यक्ष पुरुषोत्तम खांबल, राजाराम गुरव, विभाग अध्यक्ष अमोल सोगम, उपविभाग अध्यक्ष संकल्प तांबे, शाखाध्यक्ष विक्रांत बेनकर, मुकेश सोगम, रंगनाथ बारस्कर, उपशाखा अध्यक्ष दीपक घाडी यांचा समावेश आहे. वैयक्तिक व कौटुंबिक अडचणीमुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, तालुका कार्यकारिणीमध्ये फेरबदल करताना विश्वासात न घेतल्याने हे राजीनामा सत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे.