बौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:40 PM2018-05-08T16:40:53+5:302018-05-08T16:40:53+5:30

बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत्नागिरीत बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.

The resolution of the Buddhist University is agreed, the first Dhamma Council in Ratnagiri | बौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषद

बौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषद

googlenewsNext
ठळक मुद्देबौद्ध विद्यापीठाचा ठराव संमत, रत्नागिरीत पहिली धम्म परिषदसम्यक विश्व संघ डॉट इन संकेतस्थळाचे अनावरण

रत्नागिरी : बुद्धाची मैत्री हा माणसे जोडण्याचा मार्ग आहे. मैत्री मनामनाला, समाजाला जोडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बुद्धाची मैत्री आत्मसात करावी, असे प्रतिपादन धम्म परिषदेचे अध्यक्ष भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. यावेळी अन्य तीन ठरावांसह रत्नागिरीत बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.

रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सम्यक विश्व संघ यांच्यावतीने रविवारी पहिली जिल्हास्तरीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. महाथेरो (मिलिंद महाविद्यालय, मुळावा, जि. यवतमाळ) यांनी धम्मदेसना दिली. यावेळी त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म विविध जातक कथांनी स्पष्ट केला.

महाउपासक बी. हरीनाथ यांनी जन्माला येणाऱ्या व्यक्तीला मानव घडविणारा बुद्धाचा धम्म असल्याचे सांगितले. दलित समाजातील हरीनाथ यांनी बुद्धाच्या धम्माचा अंगिकार कसा केला, याविषयी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. अतुल भोसेकर यांनी धम्मभाषा व धम्मलिपी यांचा परिचय करून दिला.

ते म्हणाले की, नवीन पिढीत धम्म रूजविण्यासाठी गाव तेथे विहार आणि विहार तेथे धम्म स्कूल होणे गरजेचे आहे. बौद्ध इतिहास अभ्यासक अशोक हंडोरे यांनी बौद्ध रंगभूमी या विषयावर बोलताना त्यातील ६४ कलांचा उल्लेख केला. सम्राट अशोक याच्या काळात उर्जितावस्था मिळालेल्या या कला केवळ मनोरंजनासाठी नाही तर धम्माच्या प्रबोधनासाठी उदयास आल्याचे त्यांनी सांगितले.

बौद्ध लेणी व स्तूप अभ्यासक अशोक नगरे यांनी विविध ठिकाणच्या लेणी, स्तूप निर्मितीचा तसेच पुरातत्व शास्त्र याचा इतिहास विशद केला. याविषयीचा चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याने त्याच्या संशोधन क्षेत्रात अधिकाधिक बौद्ध बांधवांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक महेंद्र शेगावकर यांनी सम्यक संघ व त्याचे कार्य विशद करताना भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका याविषयी माहिती दिली. बुद्धाचे तत्वज्ञान मांडताना आजचे विज्ञान माहीत असावे, असे आग्रही मत त्यांनी मांडले.

प्रा. मिलिंद कदम यांनी सूत्रसंचालन केले तर राजेश कांबळे यांनी आभार मानले. धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी सम्यक विश्व संघाचे जनक धोत्रेकर, विवेक घाटविलकर, प्रा. मिलिंद कदम, राजेश कांबळे, प्रा. विकास कांबळे, सचिन कांबळे, प्रा. सुनील जोपळे यांनी परिश्रम घेतले.

प्राचीन बौद्धांनी वसाहती केल्याची नोंद

प्राचीन बौद्ध संस्कृती अभ्यासक गोपीचंद कांबळे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियर्समध्ये प्राचीन बौद्धांनी वसाहती केल्याची नोंद असल्याचे स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा (ता. संगमेश्वर) याच्या नावामागचा बौद्धकालीन संदर्भ देत येथे बुद्धानी आपल्या शिष्यगणाला उपदेश केल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. यामुळेच येथील मूळ बौद्ध बांधवांचे आडनाव सकपाळ असल्याचे सांगितले.

संकेतस्थळाचे अनावरण

या धम्म परिषदेचे औचित्य साधून सम्यक विश्व संघ ही संस्था धम्म व समाजकार्याला समर्पित करण्यात आली तसेच सम्यक विश्व संघ डॉट इन या संकेतस्थळाचे अनावरणही भदन्त प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले.

तीन प्रमुख ठराव
 

  1. - जाती प्रमाणपत्रावर बौद्ध अशी नोंद करून घेणे आणि येत्या जनगणनेत तशी नोंद करून घेणे.
  2. - रत्नागिरीतील थिबा राजवाड्यात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करणे व त्याअन्वये रत्नागिरी शहराची ओळख जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने तयार करणे.
  3. - भारतातील सर्वात उंच उभ्या बुद्धमूर्तीची स्थापना करून बौद्ध महाविहाराची निर्मिती करणे.

Web Title: The resolution of the Buddhist University is agreed, the first Dhamma Council in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.