रत्नागिरी जिल्हा परिषदेतील दोन वर्षांपूर्वीचा स्थायी समितीतील ठराव फाईलबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:37 PM2017-11-18T14:37:24+5:302017-11-18T14:43:56+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.
रत्नागिरी : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनेक कर्मचारी, अधिकारी हे कार्यालयीन कामानिमित्त फिरतीवर असतात. अनेकदा काही कर्मचारी, अधिकारी हे फिरतीचे कारण सांगतात आणि कार्यालयीन काम सोडून वैयक्तिक कामात गुंतले असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे जे कर्मचारी, अधिकारी फिरतीवर जाणार असतील, त्यांची नोंद त्या-त्या ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करण्यात यावी, असा ठराव दोन वर्षांपूर्वी झालेल्या रत्नागिरी स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला होता.
आजही अनेक कर्मचारी, अधिकारी हे फिरतीवर जात असतात. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या ठरावाप्रमाणे त्या-त्या ग्रामपंचायतींच्या नोंदवहीत त्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोंद होणे आवश्यक आहे. मात्र, तशी नोंद होत नसल्याचे पुढे आले आहे.
स्थायी समितीने घेतलेल्या या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थायी समितीच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास फिरतीवर जाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वचक राहणार होता. मात्र, तशी अंमलबजावणी करण्यास जिल्हा परिषदेकडूनच चालढकल करण्यात येत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे़
फिरतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वॉच
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत झालेल्या एखाद्या ठरावाची अंमलबजावणी करणे प्रशासनाला बंधनकारक आहे़ मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी स्थायी समितीच्या सभेतील ठरावाची प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या ठरावाची अंमलबजावणी केल्यास फिरतीवर जाणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीत आपली नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांच्यावर वॉच ठेवण्याचेच काम केले जाणार आहे. कर्मचारी, अधिकारी या ठरावामुळे अडचणीत येऊ शकतात, म्हणूनच याच्या अंमलबजावणीला टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.