रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:30 AM2021-05-23T04:30:19+5:302021-05-23T04:30:19+5:30
साहित्य वाटप लांजा : येथील कुणबी समाजोन्नती संघातर्फे साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर आदी साहित्य भेट ...
साहित्य वाटप
लांजा : येथील कुणबी समाजोन्नती संघातर्फे साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर आदी साहित्य भेट दिले. लांजा शाखाध्यक्ष संतोष माटल, सचिव संदीप पड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पंचनाम्याची मागणी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुळे विविध गावांना फटका बसला आहे. आतापर्यंत तालुक्याच्या विविध भागात १५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप पंचनामे सुरू आहेत. पंचनामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत असून अधिकृत आकडेवारी देण्याची मागणी केली जात आहे.
खोदाई धोकादायक
देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असल्याने सर्वत्र कामाचे कौतुक होत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे खोदाई केलेले रस्ते धोकादायक बनले आहेत. खोदाई केलेल्या भागातील जमीन ढासळत आहे. तोंडावर पावसाळा असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
एस. टी. फेऱ्या
राजापूर : आगारातून नालासोपारा-अर्नाळा, चिपळूण-राजापूर या दोन मार्गांवर फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करून एअर सस्पेन्शन असलेली विठाई नवीन बस सोडण्यात येत आहे. शनिवारपासून ती नालासोपारा, अर्नाळा व चिपळूण मार्गावर धावणार आहे.
आरोग्य केंद्र लवकरच सुरू
खेड : तालुक्यातील जामगे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. चाकाळे, मुर्डे, आंबये, शिवतर, तिसे, जामगे, घेरापालगड गावांसाठी आवश्यक असणारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झाले आहे. लवकरच ते लोकार्पण केले जाणार आहे.
ससाळे परिसरात अंधार
राजापूर : तालुक्यातील ससाळे व पांगरेमध्ये चक्रीवादळामुळे वीजखांब कोसळल्याने अद्याप वीजपुरवठा खंडित आहे. गेले सहा दिवस हा गाव अंधारात असून केळवली परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
मोबाइल टॉवर बंद
रत्नागिरी : तालुक्यातील अद्याप नेवरे परिसरात खासगी वाहिन्यांसाठी मोबाइल टॉवर बंद असल्याने मोबाइलची रेंज गायब आहे. त्यामुळे शासकीय व बँकांच्या कामावर परिणाम होत आहे. खासगी कंपन्यांचे ग्राहक अधिक असल्याने ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मोफत समुपदेशन
रत्नागिरी : रत्नागिरी असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनलचा प्रोजेक्ट सुकून विद्या मोहिरे समुपदेशन करीत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी शारीरिक शक्तीबरोबर मानसिक शक्ती गरजेची आहे. औषधोपचार सुरू असताना मनाने न खचता सामोरे जाल तर उपचाराचा फरक लवकर जाणवेल असे मार्गदर्शन करण्यात आले.
रस्ता दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील सागरी महामार्गावरील बसणी ते गणपतीपुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे. पावसाळा तोंडावर असून गावातील अंतर्गत रस्तेदेखील निकृष्ट झाले आहेत. खड्ड्यातून पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात संभवत आहेत.