प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद, २२ हजार मातांच्या बँक खात्यावर ९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:02 PM2020-12-29T12:02:34+5:302020-12-29T12:04:34+5:30
Government Ratnagiri- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील २२ हजार ३४८ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभधारक मातांच्या बँक खात्यामध्ये या योजनेतून ९ कोटी २० लाख ५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.
रत्नागिरी : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील २२ हजार ३४८ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभधारक मातांच्या बँक खात्यामध्ये या योजनेतून ९ कोटी २० लाख ५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.
माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. मातेला सकस आहार मिळून सुदृढ बालक जन्माला यावे, यासाठी सन २०१७पासून ही योजना रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन टप्प्यात ५ हजार रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीतही या योजनेची अंमलबजावणी करण्यास आरोग्य विभाग मागे राहिलेला नाही. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत ३ हजार ९९९ मातांना १ कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये इतके अनुदान पहिल्यांदा गरोदर व स्तनदा मातांना या योजनेंतर्गत देण्यात आले आहे.
शहरी भागामध्ये २,४६५ मातांना ९९ लाख ६० हजार आणि ग्रामीण भागातील १९,८८३ मातांना ९ कोटी २० लाख ४५ हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्यात आला. त्यामुळे शहरांपेक्षा ग्रामीण भागात या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता आला आहे.
सर्वच मातांना फायदा
पहिल्यांदा गरोदर असलेल्या मातांची नोंदणी व प्रसुती खासगी रुग्णालयात केली जाते. अशा मातांनाही या योजनेचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी पहिल्या वेळेच्या गरोदर मातांनी पहिल्या १२ आठवड्याच्या आत नोंदणी करावी लागते. सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड आणि लाभार्थीचे राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते क्रमांक व माता बाल संरक्षक कार्डाची छायांकित प्रत ही कागदपत्रे देणे आवश्यक आहे.