कोकणात गणेशोत्सवासाठी सोडलेल्या गाड्यांना प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:01+5:302021-09-09T04:38:01+5:30
रत्नागिरी : यावर्षी उत्कर्ष कुणबी संस्था (रजि.) साखरपा दाभोळे पंचक्रोशीतर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्या मुंबई ...
रत्नागिरी : यावर्षी उत्कर्ष कुणबी संस्था (रजि.) साखरपा दाभोळे पंचक्रोशीतर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्या मुंबई सेंट्रल, बोरिवली व विरार या ठिकाणाहून सोडण्यात आल्या. या गाड्यांना प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. ६३८ प्रवाशांनी आगावू आरक्षण केले. प्रवाशांसाठी सोडत (लकी ड्राॅ) काढण्यात आली. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी यावर्षी उत्कर्ष कुणबी संस्था (रजि.) साखरपा दाभोळे पंचक्रोशी तर्फे एसटी गाड्या सोडण्यात आल्या.
मुंबईवरून दि.७ व ८ सप्टेंबर व गावावरून परतीच्या १५ व १६ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणाऱ्या या गाड्यांना प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. ६३८ प्रवाशांनी आगावू आरक्षण केले.
नियोजनबद्ध सोडण्यात आलेल्या प्रत्येक एसटी गाड्यांमधील प्रवाशांना उत्कर्ष कुणबी संस्थेच्या वतीने तीन लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते.
पहिले बक्षीस प्रेशर कुकर, दुसरे बक्षीस ब्रॅण्डेड पाव किलो अगरबत्ती आणि तिसरे बक्षीस छत्री ठेवण्यात आले होते. याव्यतिरिक्त प्रत्येक प्रवाशाला बिसलेरी(पाण्याची बाटली) व मास्क संस्थेतर्फे देण्यात आले. तसेच बसमधील चालक व वाहक यांना श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्यांना एक लिटर हँड वाॅश देण्यात आले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन करून अगदी डेपोतून गाड्या ताब्यात घेण्यापासून ते प्रवाशांना वेळेवर ठरल्या ठिकाणांहून घेऊन पनवेल सोडेपर्यंत प्रवाशांसोबत होते. प्रत्येक गाडी सायनला आल्यानंतर तेथे प्रत्येक गाडीमध्ये गाडीतील एका प्रवाशाच्या हस्ते सोडत (लकी ड्राॅ) काढून तिथे त्यांना बक्षिसे देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमाला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल उत्कर्ष कुणबी संस्थेतर्फे सर्व प्रवाशांना धन्यवाद देण्यात आले.