ग्रामस्थांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:35 AM2021-09-27T04:35:03+5:302021-09-27T04:35:03+5:30
खेड : तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या दीड वर्षानंतर झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच सुनीता कासार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना ...
खेड : तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या दीड वर्षानंतर झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच सुनीता कासार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत ही ग्रामसभा पार पडली. या वेळी विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांच्या काही शंका आल्या होत्या त्यांचेही निरसन केले गेले.
ग्रामस्वच्छता अभियान
खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायत व स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणदे येथील ग्रामदैवत मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेेंतर्गत सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच संध्या कांदेकर, सदस्य सुभाष आंब्रे, रुणाली आंब्रे व अन्य सदस्य, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते.
बैठकीत चर्चा
खेड : खेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची बैठक शासकीय विश्रामगृहात कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ, तालुकाध्यक्ष शंकर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी पार्टीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
तंटामुक्त अध्यक्षपदी विलास नारकर
राजापूर : तालुक्यातील करक ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. या वेळी माजी सरपंच विलास नारकर यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विलास नारकर यांनी यापूर्वी करक ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले आहे. तसेच या परिसरात ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.
गणपतीपुळेत आज रक्तदान शिबिर
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे पंचक्रोशी मदत ग्रुपतर्फे सोमवार २७ सप्टेंबर रोजी पर्यटन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवी मंदिरात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या शिबिरात यावे व रक्तदान करावे, असे आवाहन मदत ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
गाड्यांना मुदतवाढ
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रत्नागिरी मडगाव पॅसेंजर तसेच दिवा रत्नागिरी गाडीसह आठ गाड्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्या मर्यादित कालावधीसाठी जाहीर करण्यात आल्या होत्या.