लेखापरीक्षक, लेखापाल पदांची एकाच व्यक्तीकडे जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:39+5:302021-05-15T04:30:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील नगर परिषदेत लेखापरीक्षक आणि लेखापाल या दोन्ही पदांची जबाबदारी नियमानुसार स्वतंत्र व्यक्तींकडे असणे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील नगर परिषदेत लेखापरीक्षक आणि लेखापाल या दोन्ही पदांची जबाबदारी नियमानुसार स्वतंत्र व्यक्तींकडे असणे आवश्यक आहे. मात्र ती एकाच व्यक्तीकडे का ठेवण्यात आली, असा सवाल माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत विचारला आहे. या संयुक्त जबाबदारीमुळे गैरव्यवहार व नियमबाह्य कामे होण्यास पाठबळ मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
माजी नगरसेवक मुकादम यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार सुमारे १०० कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या चिपळूण नगर परिषदेत लेखापाल आणि लेखापरीक्षक या दोन्ही पदाची जबाबदारी नियमानुसार स्वतंत्र असणे आवश्यक आहे. लेखापाल संजय गोडबोले हे अंतर्गत लेखापरीक्षक म्हणूनही अधिकार गाजवत आहेत. पालिकेच्या विकास कामात, निविदा प्रक्रियेत कायद्याचे पालन होते किंवा नाही. याबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय व शेरे देण्याचे अधिकार अंतर्गत लेखापरीक्षकास आहेत. लेखापाल आणि लेखापरीक्षक ही दोन्ही पदे समतुल्य असली तरी दोन्ही पदांची जबाबदारी आणि कर्तव्ये मात्र वेगवेगळी आहेत. मागील काही वर्षांपासून लेखापालकडेच अंतर्गत लेखापरीक्षकाची जबाबदारी व अधिकार असल्याने पालिकेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता दिसत नाही. अनेक निविदा प्रक्रिया व ठेकेदारांच्या देयकाबाबत अंतर्गत लेखापरीक्षक जाणीवपूर्वक लेखापालास अनुकूल शेरे व अभिप्राय नोंदवून त्यावर स्वाक्षरी करतात. लेखापाल म्हणून स्वतःच नोंदवलेल्या अभिप्रायाच्या आधारे निविदा व देयकास मंजुरी देतात, असे वारंवार निदर्शनास येत आहे.
एकाकडेच ही जबाबदारी असल्याने नगर परिषदेच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार व नियमबाह्य कामास पाठबळ मिळते. त्यामुळे ही दोन्ही पदे व अधिकार एकाच व्यक्तीकडे असणे बेकायदेशीर आहे. तेव्हा गोडबोले यांनी अंतर्गत लेखापरीक्षक व लेखापाल या दोन्ही पदांचा वापर करून दिलेल्या निविदा व देयकाबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. गोडबोले यांनी नोंदवलेले शेरे व अभिप्राय याची तपासणी करण्यात यावी, त्यामध्ये काही गैर आढळल्यास पुढील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.