पावसाच्या विश्रांतीने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:36+5:302021-07-25T04:26:36+5:30
रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...
रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, चिपळूण, खेड आदी पूरबाधित शहरांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने पूर ओसरला असला तरी ही शहरे आणि परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यास अजूनही काही कालावधी जाणार आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने केवळ रात्रीत उच्चांकी नोंद केली. या पावसाने खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या शहर आणि परिसरात पूरपरिस्थिती निर्माण केली. चिपळूणमध्ये केवळ २४ तासांत ६०० मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच नद्यांना आलेला पूर आणि कोळकेवाडी धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे चिपळुणात महापूर आला. सर्व घरांमध्ये, बाजारपेठेत पाणी घुसले. त्यामुळे ३० तासांपेक्षा अधिककाळ नागरिक पुराच्या वेढ्यात अडकले. या महाप्रलयात सुमारे ६० हजार लोक अडकले होते. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने या ठिकाणी मदतकार्याला वेग आला आहे. मात्र, चिखल मोठ्या प्रमाणावर असल्याने पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. इथले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही काही कालावधी जाणार आहे. खेड, राजापूर, संगमेश्वर आदी भागातील पूरपरिस्थिती आता निवळली आहे. त्यामुळे या शहर आणि परिसरातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत चिपळूण तालुक्यात खासगी आणि शासकीय मालमत्तांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे सुरू आहेत.
शुक्रवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी दिवसभर किरकाेळ सरी वगळता पाऊस थांबला होता. अधूनमधून उन्हाचेही दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, हवामान विभागाने अजूनही २६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांच्या मनात पावसाची भीती कायम आहे.