जिल्ह्यात पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:44+5:302021-06-21T04:21:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. आतापर्यंतच्या पावसामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. आतापर्यंतच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विहिरी व धरणांच्या पाणीसाठ्याची पातळीही वाढली आहे. पावसामुळे चिपळूण तालुक्यातील कादवड येथे वाडा कोसळून वृद्धाचा मृत्यू व तीन मुले जखमी झाली आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३३.६७ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, आतापर्यंत सरासरी ३०३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे डोंगरावरील माती रस्त्यावर आली असून आधीच निकृष्ट असलेल्या रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील कासारवाडी येथील सीताराम लक्ष्मण घाणेकर यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. कादवड येथे वाडा काेसळून बबन लक्ष्मण निकम (६५) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर माधुरी गणेश निकम (१०), आरती संजय पवार (१५), मयूर लवेश जाधव (७) ही तीन बालके जखमी झाली आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे संगमेश्वर येथे विजेच्या धक्क्याने अनिल दत्तात्रय लाड यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील आतगाव येथील रंजना रमेश कदम यांच्या गोठ्याचे ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दाभोळ बेंडलवाडी येथील रचना चंद्रकांत राणे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले आहे. चिपळूण तालुका वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही जीवितहानी झालेली नाही.