जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपाहारगृह अडचणीच्या जागेत; नागरिकांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:05+5:302021-03-25T04:29:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या उपाहारगृहाला नागरिकांच्यादृष्टीने या परिसरात सोयीची जागा मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असलेल्या जुन्या धान्याच्या गोदामाच्या एका बाजूला दोन वर्षांपासून हे उपाहारगृह सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पोस्ट कार्यालय, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, कोषागार कार्यालय, तसेच जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेली विविध कार्यालये, या कार्यालयांमध्ये जिल्ह्यातील विविध भागामधून शेकडो स्त्री-पुरूष विविध शासकीय कामांसाठी येत असतात. काही वेळा या नागरिकांच्या कामासाठी उशीर झाल्यास दिवसभर थांबावे लागते. त्यामुळे या परिसरात असलेल्या या उपाहारगृहामुळे त्यांना दुपारचे भोजन किंवा अल्पोपाहाराची सोय होत होती. त्याचबरोबर येथील विविध कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनाही या उपाहारगृहाचा आधार होत होता.
मात्र, काही महिन्यांपूर्वी धान्य गोदामाची जुनी इमारत पाडून ही जागा मोकळी करण्यात आली आहे. या ठिकाणी ध्वजस्तंभ तसेच उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे उपाहारगृह बंद करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयांमध्ये काही वेळा लहान मुले, वृद्धांना घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली. सध्या हे उपाहारगृह महसूल कर्मचारी पतपेढीच्या लगत एका कोपऱ्यात सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथील जागेत जेमतेम पाच - सहा जण बसू शकतील, एवढी अपुरी जागा आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसोबत वृद्ध किंवा लहान मुले असल्यास अतिशय अडचण होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीनेही ही जागा अयाेग्य आहे. या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये कामासाठी दुरून येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून या परिसरात योग्य जागेत हे उपाहारगृह चालविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या परिसरात येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
कोटसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी आल्यास काही वेळा अख्खा दिवसही जातो. त्यामुळे या परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य ठिकाणी उपाहारगृह असणे गरजेचे आहे.
- अनंत ताम्हणकर, संगमेश्वर