रुग्ण नसलेल्या घरासमाेर प्रतिबंधित क्षेत्राचा फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:02+5:302021-05-06T04:33:02+5:30
राजापूर : शहरातील गजबजलेल्या वस्तीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर राजापूर नगर परिषदेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून लावलेला फलक रात्री अचानक ...
राजापूर : शहरातील गजबजलेल्या वस्तीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर राजापूर नगर परिषदेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून लावलेला फलक रात्री अचानक गायब करीत तो शहरातील एका नुकत्याच सेवामुक्त झालेल्या व्यक्तीच्या घरासमोर लावण्यात आल्याने शहरात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. हा फलक कोणी लावला याची माहिती नसली तरी हा फलक का लावण्यात आला, याच्या मात्र चर्चा शहरात खुमासदारपणे सुरू आहेत.
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातलेले असून, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये राजापूर शहरातील अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. राजापूर शहरातील गजबजलेल्या वस्तीमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर राजापूर नगर परिषदेने ती इमारत कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली. त्या ठिकाणी गत आठवड्यात प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा फलक लावला होता. जेणेकरून त्या इमारतीमधील कोणी व्यक्ती बाहेर येऊ नये अथवा बाहेरील कोणी व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन संक्रमित होऊ नये.
दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक हा फलक कोणीतरी गायब करीत राजापूर शहरातील एका घरासमोर नेऊन ठेवला. त्या घरातील कोणीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हती. मात्र असा प्रतिबंधित क्षेत्राचा फलक सकाळी - सकाळी अचानक त्या घरासमोर दिसल्याने शेजारी व संबंधित भागात एकच खळबळ उडाली व या घरामध्ये नक्की कोण कोरोना संक्रमित झाले? याची चौकशी सुरू झाली. तेथे कोणीही कोरोना रुग्ण नसल्याची बाब पुढे आली व सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, हा फलक असा अचानक कोणी आणून लावला याचा शोध सुरू झाला. मात्र त्यातून काहीच माहिती पुढे आली नाही. पण, फलक या ठिकाणी का आणून ठेवला असेल, याचे तर्कवितर्क मात्र चांगलेच चर्चेत हाेते.