आखाती देशांचे कोकणच्या हापूसवर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:18 AM2019-02-09T05:18:17+5:302019-02-09T05:18:38+5:30
कोकणाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या हापूसच्या निर्यातीमागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनीही हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत.
रत्नागिरी - कोकणाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या हापूसच्या निर्यातीमागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनीही हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत.
हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत यंदा आखाती देशांनी कडक भूमिका घेतली आहेत. फळामध्ये रासायनिक अंश सोडणाºया कीटकनाशकांवर तेथे बंदी घालण्यात आल्यामुळे अशी फवारणी झालेले हापूस न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात त्यांनी घेतला आहे.
मुंबईतील वाशी मार्केटमधून आखाती प्रदेशात आंबा निर्यात करण्यापूर्वी ‘कोडॅक्स’ कंपनीकडून त्याची तपासणी करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच कोकणातून पाठविण्यात आलेला आंबा मुंबई मार्केटमधून दुबईसाठी निर्यात करण्यात आला. त्या फळांच्या निर्यातीपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कीटकनाशकांचा अंश आढळला नाही. परंतु यापुढील तपासणीत अशा प्रकारचा अंश आढळल्यास माल परत पाठविण्यात येणार असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
उत्पादनाच्या ३० टक्के हापूस आखाती प्रदेशात, दहा टक्के युरोप, अमेरिकेत, ४० टक्के मुंबईत व उर्वरित २० टक्के देशातील अन्य बाजारपेठेत विकला जातो. आंबा बाजारात येण्यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे फवारणी करण्यापूर्वी सावधानता बाळगावी, असे मुंबई-वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
घातक फवारण्या नको
बुरशीसाठी वापरण्यात येणारे कार्बन डेझीम, कीटकनाशक म्हणून वापरले जाणारे क्लोरो पायरीफोस या औषधांवर आखाती देशांनी बंदी आणली आहे. फवारणीनंतर या कीटकनाशकांचा प्रभाव फळांमध्ये राहत असल्याने आणि तो शरीरासाठी अपायकारक असल्याने ही कीटकनाशके फवारलेला आंबा न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.