रत्नागिरीत चाैथ्या स्तरातील निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:17+5:302021-06-27T04:21:17+5:30
रत्नागिरी : शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या कोविड संदर्भातल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा हा अद्यापही चौथ्या स्तरात असल्याचे जिल्हाधिकारी ...
रत्नागिरी : शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या कोविड संदर्भातल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा हा अद्यापही चौथ्या स्तरात असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे चौथ्या स्तरासाठी चालू असलेले निर्बंध यापुढेही चालूच राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ११ आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी चौथ्या स्तरासाठीचे निर्बंध लागू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात निर्बंध शिथील करण्याची प्रक्रिया पाच स्तरांमध्ये सुरू झाली आहे. यासाठी शासनाने ऑक्सिजन बेड आणि पाॅझिटिव्हिटी रेट हे निकष ठेवले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरामध्ये होतो. त्यामुळे जिल्ह्याला चौथ्या स्तराचे निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा तिसऱ्या स्तरात येण्याची शक्यता निर्माण होत असतानाच पुन्हा २२ जून रोजी जिल्ह्यातील रहिवासी अन्य जिल्ह्यात पाॅझिटिव्ह आल्याने त्यांची संख्या एकदम नऊ हजाराने वाढली. त्यामुळे जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट कमी होण्याऐवजी वाढला.
त्यातच जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नऊ रूग्ण सापडले. अन्यही सहा जिल्ह्यांमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण सापडल्याने रत्नागिरी - सिंधुदुर्ग यासह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दिल्या. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट पुन्हा वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हा पुन्हा चौथ्या स्तरात असल्याचे जाहीर केले असून, याआधीचे निर्बंध यापुढेही चालू राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ९ जूनपासूनचे निर्बंध यापुढेही कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत कायम राहणार आहेत.
या निर्बंधानुसार किराणा, औषधे, शेतीविषयक दुकाने तसेच अत्यावश्यक सेवांशी निगडीत अन्य दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत सुरू राहणार आहेत. तसेच गेल्या आदेशामध्ये ज्या बाबींना ठराविक वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यांनाही कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमावलीचे पालन करून यापुढेही सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.