खाऊगल्लीतील व्यावसायिकांवर निर्बंध, रत्नागिरी नगर परिषदेच्या सभेत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 PM2020-12-30T16:28:50+5:302020-12-30T16:30:20+5:30
Ratnagiri Nagar Parishad - खाऊगल्लीतील एका व्यावसायिकाने नगरसेवक आणि पदाधिकारी हप्ते घेतात, असे आरोप केले होते. यावर सर्वसाधारण सभेसमोर खाऊगल्ली कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव होता. त्यावर खाऊगल्लीत व्यावसायिकांवर निर्बंध लावण्याचा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
रत्नागिरी : खाऊगल्लीतील एका व्यावसायिकाने नगरसेवक आणि पदाधिकारी हप्ते घेतात, असे आरोप केले होते. यावर सर्वसाधारण सभेसमोर खाऊगल्ली कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव होता. त्यावर खाऊगल्लीत व्यावसायिकांवर निर्बंध लावण्याचा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
खाऊगल्लीतील व्यावसायिकांबाबतच्या निर्बंधाबाबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी माहिती दिली. खाऊगल्लीतील प्रत्येक व्यावसायिकाला ओळखपत्र, हातगाडी नंबर देण्यात येणार आहेत. तसेच खाऊगल्लीतील हातगाडी मालकाने हातगाडी भाड्याने दिली असेल तर ती गाडी तेथे व्यवसाय करण्यास पात्र नसेल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
मध्यवर्ती बसस्थानकासमोर आणि जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निर्बंध घालून काही वडापाव गाड्या करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, सर्व ठिकाणी स्वच्छतेची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही नगराध्यक्षांनी बजावले. यापुढे नगरसेवकांची बदनामी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची विनंती भाजप गटप्रमुख समीर तिवरेकर यांनी केली.
अत्यावश्यक वस्तू, व्यवसाय, वैद्यकीय उपचारासाठी नगर परिषदेकडून आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी १० लाख २० हजार रुपये खर्चासाठी निधीला मंजुरी देण्यात आली. पाणी समिती सभापती दिशा साळवी यांनी नवीन नळपाणी योजनेच्या खुदाईमुळे अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या फुटून पाणीपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पाणी पुरवठ्यात अडथळा येतो. दोन टँकर भाड्याने घेण्याची सूचना केली.
नगर परिषदेला दंड
नागरी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियम २०१६ व पर्यावरणविषयक बाबींचे अनुपालन न झाल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराने राज्यातील नगरपरिषदांना दंड ठोठावला आहे. रत्नागिरी नगर परिषदेला या प्रकरणी आठ लाख रुपये दंड झाला आहे. तो भरण्याबाबतचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.